एकाच षटकात 3 बळी, आता कुलदीप पुढचा सामना खेळणार नाही… माजी क्रिकेटपटूची संघ व्यवस्थापनावर बोचरी टीका

कुलदीप यादवने 6 महिन्यांनंतर भारतासाठी सामना आणि जवळजवळ 15 महिन्यांनंतर टी20 सामना खेळला पण तो येताच त्याने धमाल केली. ज्यात त्याने 4 बळी घेतले. शिवाय त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. आशिया कपमध्ये यूएईविरुद्धच्या त्याच्या कामगिरीने त्याने टीकाकारांच्या आणि त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या तोंडावर टेप लावली आहे. प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणे त्याच्यासाठी खूप वेदनादायक होते असे त्याने म्हटले तेव्हा त्याचे दुःखही दिसून आले.

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाने भारताच्या सध्याच्या नंबर1 स्पिनरकडे दुर्लक्ष कसे केले यावर टोमणा मारला. तो म्हणाला- आता कुलदीप पुढचा सामना खेळू शकणार नाही.

मांजरेकर सोनी स्पोर्ट्सवर म्हणाला, ‘आता कुलदीप यादवने एका षटकात 3 बळी घेतले आहेत, तो पुढचा सामना खेळणार नाही कारण भारत त्याच्याशी असे वागतो. जेव्हा तो चांगला खेळतो तेव्हा त्याला वगळले जाते. त्याने 4 बळी घेतले आणि आता तो पुढचा सामना खेळेल अशी आशा नाही.

मांजरेकरने त्याची टिप्पणी हलक्याफुलक्या पद्धतीने, विनोदी स्वरात दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी, अशा प्रकारे त्याने एक अतिशय कटू सत्य सांगितले. तो म्हणाला, ‘”कुलदीप यादवला जेव्हा संघातून काढलं जातं, तेव्हा तो परत येऊन काहीतरी जबरदस्त करतो. त्याचे रेकॉर्ड बघा, टेस्ट, वनडे किंवा टी२० – सगळीकडे तो अप्रतिम आहे. तो भारतीय संघासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे, पण त्याचं नशीब असंच आहे.”

बुधवारी युएई विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवची जादू अशा प्रकारे कामी आली की विरोधी संघ आशिया कप टी-20 च्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात कमी धावसंख्येवर बाद झाला. त्याने 2.1 षटकात फक्त 7 धावा देऊन 4 बळी घेतले. आशिया कप टी20 च्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Comments are closed.