कुलदीप यादवची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! चहलला मागे टाकत ठरला नंबर-1 गोलंदाज
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbern Cricket Ground IND vs AUS) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला कांगारूंनी 4 विकेट्सने पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची संपूर्ण टीम फक्त 125 धावांवर गारद झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 13.2 षटकांतच लक्ष्य पूर्ण करत सामना सहज जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
टीम इंडिया जरी हा सामना हरली असली, तरी भारतीय फिरकीवीर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या बाबतीत त्याने युजवेंद्र चहलला (Yujvendra Chahal) मागे टाकत नंबर-1 स्थान मिळवलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श आणि जोश इंग्लिश यांना माघारी पाठवलं. या दोन विकेट्समुळे कुलदीप आता टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये परदेशी मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
त्याने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडत पहिलं स्थान मिळवलं. आतापर्यंत कुलदीपने परदेशी मैदानावर 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 11.2 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलने 32 सामन्यांत 27.62 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत 3ऱ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या 36 विकेट्स, 4थ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह 34 विकेट्स, आणि 5व्या क्रमांकावर अर्शदीप सिंग 32 विकेट्स आहे.
परदेशी मैदानांवर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज:
कुलदीप यादव – ३९
युझवेंद्र चहल – ३७
हार्दिक पांड्या – ३६
जसप्रीत बुमराह – ३४
अर्शदीप सिंग – ३२
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि टीम फक्त 18.4 षटकांत 125 धावांवर आटोपली.
भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 68 धावा (37 चेंडू) केल्या, तर हर्षित राणाने 35 धावा (33 चेंडू) केल्या. इतर 9 फलंदाज दहाच्या आकड्यापर्यंतही पोहोचू शकले नाहीत.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकांत 6 विकेट्सवर 126 धावा करत सामना जिंकला. ही भारताची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट चेंडूंच्या दृष्टीने दुसरी सर्वात मोठी हार ठरली. ऑस्ट्रेलियाने सामना 40 चेंडू शिल्लक ठेवून जिंकला. यापूर्वी, 2008 मध्ये मेलबर्नमध्येच ऑस्ट्रेलियाने 52 चेंडू शिल्लक ठेवून भारतावर विजय मिळवला होता.
 
			 
											
Comments are closed.