मध्य विभागाच्या जेतेपदाची औपचारिकता शिल्लक, कार्तिकेय, सारांश यांची अचूक गोलंदाजी

कुमार कार्तिकेय (4 बळी) आणि सारांश जैन (3 बळी) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मध्य विभागाने रविवारी चौथ्या दिवशी दक्षिण विभागाचा दुसरा डाव 121 षटकांत 426 धावांवर संपविला. आता मध्य विभागाला दुलीप करंडकावर नाव कोरण्यासाठी केवळ 65 धावांची गरज असून उद्याचा अखेरचा दिवस म्हणजे या जेतेपदाची केवळ औपचारिकता असेल.
दक्षिण विभागाला 129 धावांवर गुंडाळल्यावर मध्य विभागाने 511 धावांचा डोंगर उभारून पहिल्या डावात 382 धावांची मोठी आघाडी घेतली. पिछाडीवर पडलेल्या दक्षिण विभागाने शनिवारच्या 2 बाद 192 धावसंख्येवरून चौथ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र या धावसंख्येत 30 धावांची भर टाकत रिकी भुई 45 धावांवर बाद झाला. दीपक चहरने एस. शर्माकरवी त्याला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला (27) कुमार कार्तिकेयने बाद केले. सलमान निजार (12) आणि आर. स्मरण (47) देखील कार्तिकेयचे बळी ठरले.
दक्षिण विभागाचा दुसरा डाव 6 बाद 222 असा संकटात असताना अंकित शर्मा आणि सी. आंद्रे सिद्धार्थ यांनी संघाला सावरले. दोघांनी 330 चेंडूंत 192 धावांची भागीदारी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या अंकित शर्माला कार्तिकेयने झेलबाद करून मोठा धक्का दिला. अंकित शर्माने 168 चेंडूंत 13 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 99 धावा केल्या. अवघ्या एका धावेने त्याला शतकाने हुलकावणी दिली. मग गुरजपनीत सिंहला (नाबाद 3) सारांश जैनने बाद केले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मध्य विभागाने दक्षिण विभागाला 426 धावांवर रोखले. सी. आंद्रे सिद्धार्थ 84 धावांवर नाबाद राहिला, मात्र दक्षिण विभागाला 64 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे मध्य विभागाला विजयासाठी आता केवळ 65 धावांची गरज आहे आणि अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे. त्यामुळे मध्य विभागाच्या जेतेपदाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मध्य विभागाकडून कुमार कार्तिकेयने 4, तर सारांश जैनने 3 बळी घेतले. याचबरोबर कुलदीप सेन आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
Comments are closed.