’कुर्ला टू वेंगुर्ला’ला थिएटर मिळेना, नाट्यगृहात लावलेला शो हाऊसफुल्ल

माती आणि नाती जोडणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट सध्या तुफान गर्दी खेचत आहे. मात्र दक्षिणेतील ’कांतारा’मुळे या चित्रपटाला थिएटर मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून खास लोकाग्रहास्तव वेंगुर्लेकरांनी मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात चित्रपटाचे शो लावले. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने एका दिवसात एका मागोमाग एक चार शो हाऊसफुल्ल झाले.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट हाऊसफुल्ल चालला होता. साऊथचा ‘कांतारा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र बहुतेक थिएटरमधून तो हटवण्यात आला. गोरेगावमधील मूव्हीटाईम हब या थिएटरमध्ये या चित्रपटाचा एक शो चालू आहे. हा शोही रोज हाऊसफुल्ल होत आहे.
ग्लोबल कोकण, मराठी एकीकरण समिती, शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटनांनी एकत्रितपणे या चित्रपटामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात वैभव मांगले, सुनील तावडे, वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, साईंकीत कामत, स्वानंदी टिकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्गज कलाकारांनीही कौतुक केले आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आहे, असे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. तर, हा सिनेमा म्हणजे कलेच्या बजबजपुरीत वाजणारे खणखणीत नाणं असल्याचे दिग्दर्शिका सई परांजपे म्हणाल्या.
Comments are closed.