लाडकी बहिण योजनेमुळं सरकारची दमछाक, इतर विभागांचा निधी वळवला, दुसऱ्या योजनांना घरघर?

लाडकी बहिन योजना: विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेमुळे महायुती सरकारला घवघवीत यशही मिळालं. मात्र आता सरकारची दमछाक होते की काय असा प्रश्न समोर येत आहे. कारण इतर विभागांचा निधी तर वळवला जातोय. त्यासोबतच अनेक योजनांवरही या योजनेचा परिणाम होताना पाहायला मिळत आहे.

इतर विभागांचा निधीही आता लाडक्या बहिणीकडे वळवला जातोय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभेत गेम चेंजर ठरली होती. मात्र आता या योजनेमुळे इतर योजनांना घरघर लागली की काय? असा प्रश्न समोर येत आहे. दलित आदिवासी समाजासाठी सुरु केलेल्या विभागाचा निधीही आता लाडक्या बहिणीकडे वळवताना पाहायला मिळतोय. शुक्रवारी राज्य सरकारने शासन निर्णय काढून आदिवासी विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणीसाठी महिला व बालविकास विभागाला वर्ग केलाय. या आधीही आदिवासी विभागाचा 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांकडून मोठया प्रमाणावर टिका होताना पाहायला मिळत आहे.

अनेक योजनांवरही परिणाम

लाडक्या बहिणीसाठी या दोन विभागांचा फक्त निधी वळवला नाही तर इतर विभागांच्या योजनांवरती ही मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळीलाही फटका बसला आहे. गोपिनाथ मुंडे अपघात विमा या योजनेत बसणाऱ्या जवळपास 3 हजार  शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. मात्र त्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. त्यांना मदत मिळावी म्हणुन कृषी विभागाने 60 कोटी 33 लाख रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे. मात्र अद्याप मदत मिळाली  नाही. तर लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर आनंदाचा शिधाच अद्याप वाटप झालेला नाही.  शिवभोजन थाळीची संख्या सध्या राज्यात दररोज 2 लाख आहे त्याची संख्या वाढवावी असा प्रस्ताव असतानाही त्यात वाढ करण्यात आलेली नाही.

यावरती प्रतिक्रीया देताना स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक प्रकारे मान्य केलेला आहे की आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवता येत नाही. पण त्यांच्याच सरकारने शासन निर्णय काढीत धडधडीत हा निधी वळवलेला पाहायला मिळतोय. आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला असता तरी या विभागाला निधी कमी पडू देणार नाही अस खुद्द आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरली असली तरी आता पांढरा हत्ती ठरु लागलेली आहे. त्यामुळं इतर विभागातील निधी वळवायला सुरुवात झालेली आहे. इतर मंत्र्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या गळ्यातले लोढणं बनलय का? असा प्रश्न समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीसाठी वळवला आदिवासी विभागाचा निधी; मंत्र्यांची नाराजी, इतर योजनांना मोठा फटका

अधिक पाहा..

Comments are closed.