लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
दिल्लीतील रुग्णालयात झाले उपचार : प्रकृतीत सुधारणा
►वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गावरील उपचारानंतर 19 ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 98 वर्षीय अडवाणी यांना 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सूरी यांच्या देखरेखीखाली अडवाणी यांच्यावर उपचार करण्यात आले. दाखल केल्यापासून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते
लालकृष्ण अडवाणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. 1998-2004 या काळात गृहमंत्री तर 2002-04 या काळात ते उपपंतप्रधान होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी तीनवेळा जबाबदारी सांभाळली. 2024 साली अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले.
Comments are closed.