लालू प्रसाद यांचा 'लाल' फ्लॉप
बिहारच्या महासंग्रामात रालोआने मारली बाजी, महाआघाडी पराभूत
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा दारुण पराभव केवळ जागांचे गणित नव्हे, तर रणनीति, नेतृत्व, समन्वय आणि वस्तुस्थितीकडे दुर्लक्षाचा समग्र परिणाम आहे. निवडणूक केवळ जुनी समीकरणे, नारे किंवा आघाडीद्वारे जिंकता येत नाही हे या महाआघाडीच्या दारुण पराभवाने स्पष्ट झाले आहे. मजबूत नेतृत्व, संघटनात्मक सक्रीयता आणि स्पष्ट राजकीय नॅरेटिव्हच विजयाची पुंजी आहे. बिहार निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षांच्या राजकारणाचे संकट आणि महाआघाडीतील अंतर्गत कलह उघड करतो. महाआघाडीच्या पराभवाची अनेक कारणे असून यामुळे लालूप्रसादांचे ‘लाल’ फ्लॉप ठरले आहेत.
1 नेतृत्वहीनता आणि समन्वयाचा अभाव
हा घटक महाआघाडीचे सर्वात दुर्बलस्थान राहिला. तसेच त्याच्या नेतृत्वाचे अस्थिर स्वरुप पराभवाचे कारण ठरले. निवडणुकीच्या प्रारंभिक टप्प्यात राजद आणि काँग्रेसदरम्यान नेतृत्व आणि समन्वय तसेच चेहऱ्यावरून झालेला वाद जनता आणि मतदारांनाही जाणवला होता. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष जागावाटपापासून प्रचाराच्या रणनीतिर काम करतात, परंतु त्यावेळी महाआघाडीच्या सर्व पक्षांमध्ये जागावाटपावरून खेचाखेची, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून दबावतंत्र सुरू होते. तेजस्वी यादवही रणनीति प्रकरणी अपयशी ठरले आहेत. त्यांनी भले राज्यभरात फिरून प्रचारसभा घेतल्या असल्या तरीही आघाडीतील घटक पक्षांसोबत मुद्दे आणि जागांवरून एखादी ठोस समन्वित रणनीति तयार करण्यास ते अपयशी ठरले.
2 जातीय व सामाजिक समीकरणांचे चुकीचे आकलन
बिहारच्या राजकारणात सामाजिक समीकरणे केवळ आकडे नसून विश्वास आणि तळागाळाशी जोडलेले आहेत. यावेळी महाआघाडीने जातीय गणिताचा अतिविश्वासपूर्वक वापर केला, परंतु सामाजिक परिवर्तन आणि नव्या समीकरणांना समजून घेण्यास गल्लत केली. कनिष्ठवर्ग आणि मागासवर्गामध्ये एक नवी राजकीय चेतना निर्माण होत असून याचा लाभ रालोआने चांगल्याप्रकारे घेतला आहे. महिला मतदार, नवमतदार आणि बिगर-पारंपरिक जातीय समुहांमध्ये महाआघाडीला स्वत:चे स्थान निर्माण करता आले नाही. महाआघडी केवळ जुन्या मतपेढीवर निर्भर राहिली, तर मतदार नवे मुद्दे, नवे चेहरे आणि स्थिर नेतृत्वाच्या शोधात होते.
3 काँग्रेस कमकुवत घटक, अंतर्गत कलह
महाआघाडीचा मोठा स्तंभ असूनही काँग्रेस या निवडणुकीत पुन्हा भार ठरला आहे. पक्षात तिकिटवाटपावरून प्रचंड नाराजी होती. अनेक जागांवर चुकीच्या उमेदवाराच्या निवडीमुळे स्थानिक समीकरणे बिघडली. कृष्णा ल्लावारून यासारख्या प्रभारी नेत्यांच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष राहिला. राजद-काँग्रेस दरम्यान जागावाटपावरून तीव्र मतभेद कायम राहिला. यामुळे संयुक्त लढाई कमकुवत, विखुरलेली आणि अविश्वसनीय दिसून आली. काँग्रेसची कमकुवत प्रचारयंत्रणा आणि प्रचाराची अनियिमितता देखील महाआघाडीसाठी नुकसानदायक राहिली.
4 मुद्द्यांच्या जुगलबंदीत पिछाडी
महाआघाडी निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्यास पूर्णपणे अपयशी ठरली. रोजगार, महागाई, शिक्षण आणि कृषी यासारखे मोठे मुद्दे उपस्थित झाले, परंतु नॅरेटिव्ह तयार करता आला नाही. याच्या उलट रालोआने विकास, कायदा-सुव्यवस्था आणि स्थिर सरकारच्या मॉडेलला आक्रमकपणे जनतेपर्यंत पोहोचविले. महाआघाडीचा आवाज मतदारांपर्यंत विखुरलेला अन् अस्पष्ट पोहोचला. तेजस्वी यादवांच्या सभांमध्ये जुन्या आश्वासनांचाच पुनरुच्चार झाल्याने युवांना नवी दिशा मिळू शकली नाही.
5 उमेदवार निवड, संघटनात्मक शिथिलता, स्थानिक असंतोष
महाआघाडीत स्थानिक स्तरावर निष्क्रीयता पराभवास कारणीभूत ठरली आहे. महाआघाडी अनेक क्षेत्रांमध्ये योग्यवेळी कार्यकर्त्यांना सक्रीय करयणस अपयशी ठरली. राजदच्या अनेक जुन्या मजबूत मतपेढी असलेल्या भागांमध्ये बूथ व्यवस्थापन कमकुवत राहिले. याचबरोबर ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्यात आले, तेथे स्थानिक असंतोष उघडपणे समोर आला. काँग्रेसचे अनेक उमेदवार हे लोकांसाठी नवखे होते. युवा आणि महिलांना स्वत:च्या बाजूने वळविण्यास महाआघाडी अपयशी ठरली.
Comments are closed.