मंत्रालयातील ‘त्या’ लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर पलटवार
Radhakrishna Vikhe Patil : काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी (Lamborghini) कार आली होती. विशेष म्हणजे मंत्रालयात सर्व सामान्य जनतेला प्रवेश करायला तासंतास वाट बघावी लागते. मात्र या लॅम्बोर्गिनी कारची चेकिंग न करताच या कारला मंत्रालयात एन्ट्री देण्यात आल्याने सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. तर या गाडीतून एक व्हिआयपी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना भेटायला आल्याची माहिती समोर आली होती. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लॅम्बोर्गिनीचे मालक कुमार मोरदानी नावाची व्यक्ती असल्याचे सांगत अनेक गंभीर आरोप केले होते. आता यावर खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्रालयात जर कुठलीही गाडी येणार असेल तर त्या गाडीचा पास काढावा लागतो किंवा स्पेशल पास घ्यावा लागतो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात यायचं असेल तर पास काढणे आवश्यक असते. मात्र आलिशान लॅम्बोर्गिनी कार मंत्रालयाच्या गेटवर आल्यानंतर त्यावेळी कारची कुठल्याही प्रकारची चेकिंग करण्यात आली नाही. ही कार थेट मंत्रालयामध्ये दाखल झाली होती. तर मंत्रालयात मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो, त्याच ठिकाणी ही कार थांबली होती. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
या प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की, लॅम्बोर्गिनी गाडी माझ्याकडे आली, अशी चर्चा झाली. माझ्या आजपर्यंतच्या जीवनात असे कधी झाले नाही. मंत्रालयात अनेक गाड्या येत असतात. ही गाडी माझ्याकडे आली हे कसे? आधी चौकशी करायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. तर काळ्या काचा होत्या, असे म्हणत होते. काचा खाली करून बघायला पाहिजे होते, कदाचित रोहित पवार त्यात दिसले असते, असा पलटवार त्यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय. आता रोहित पवार यावर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रोहित पवारांचा आरोप काय?
मंत्रालयात आलेल्या लॅम्बोर्गिनीवरून रोहित पवारांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. आर्थिक गुन्हे शाखेने या व्यक्तीच्या विरोधात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. ग्राहकांनी ज्या प्रकल्पासाठी 19 कोटी दिले होते, बँकांनी ज्या प्रकल्पासाठी 202 कोटीचे कर्ज दिले ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता 221 कोटीपैकी 196 कोटी दुसरीकडेच वळवले होते. शिवाय प्रकल्पाला 6 मजल्यांची परवानगी असताना 13 मजले बांधले आणि रेरा कायद्याचे देखील उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.