हिमाचलमध्ये लँडस्लाइडने बस मारली, 15 ठार

बिलासपूर येथे मोठी दुर्घटना : भूस्खलानंतर ढिगारा थेट बसवर कोसळला

वृत्तसंस्था/ बिलासपूर

हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये मरोतन येथून घुमारवींच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसवर दरड कोसळली आहे. भूस्खलानंतर ढिगारा बसच्या छतावर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. बसमधील 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर दोन मुली आणि एका मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. यातील एका मुलीची आई दुर्घटनेत मृत्यमुखी पडली आहे. या मुलींवर बरठीं रुग्णालयात प्रारंभिक उपचार करण्यात आले.

या बसमधून सुमारे 35 जण प्रवास करत होते असे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसमदये मरोतन बरठीं, घुमारवीं आणि मधल्या ठिकाणी उतरणारे प्रवासी होते. दुर्घटनेत चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला आहे. तर मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. बचावकार्य रात्रभर राबवून बसमध्ये अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाणार होते.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

दुर्घटनेबद्दल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांबद्दल संवेदना व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार   प्रभावित परिवारांसोबत पूर्ण मजबुतीने उभे असून त्यांना शक्य ती सर्व मदत प्रदान केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मदतकार्याला वेग

मुख्यमंत्री सुक्खू हे निरंतर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी मदत तसेच बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना उपचाराकरता त्वरित रुग्णालयात पोहोचविण्याचे आणि उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्याचा निर्देश अधिकाऱ्यांना देला आहे. मुख्यमंत्री सुक्खू हे शिमला येथून स्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहेत. बस दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री हे त्वरित घटनास्थळासाठी रवाना झाले होते.

Comments are closed.