सिक्कीममध्ये निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन.

10 कामगारांचा मृत्यू : 17 अद्याप आत अडकून : ढिगाऱ्यामुळे भुयार बंद

वृत्तसंस्था/ गंगटोक

सिक्कीममध्ये एका भुयारात भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले असून यामुळे त्याच्या आत 27 कामगार अडकून पडले. यातील 10 कामगारांचा मृत्यू झाला असून यातील 3 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर 17 कामगार अद्याप आतमध्ये अडकून पडले आहेत. हे भुयार तीस्ता स्टेज-6 हायड्रोइलेक्ट्रिक ऊर्जा प्रकल्पासाठी पटेल इंजिनियरिंग कंपनीकडून निर्माण केले जात होते.

नामची जिल्ह्dयाच्या मामरिंग येथील समरदुंग भुयाराचे निर्मितीकार्य सुरू होते. याचदरम्यान ही दुर्घटना घडली आहे. भुयाराच्या आत अडकून पडलेल्या कामगारांची संख्या 27 पेक्षा कमी किंवा अधिक असू शकते असे पोलीस अधीक्षक सोनम डोल्मा यांनी सांगितले आहे. या भुयारात मिथेन वायूची गळती होण्याची भीती आहे. अनेक बचाव कर्मचाऱ्यांना भुयारात शिरल्यावर चक्कर आली, तर काही जण बेशुद्ध पडल्याने बचाव अभियान प्रभावित झाले.

बंगालमधून विशेष बचावपथक

भुयार निर्मितीच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेची माहिती सोमवारी कळली होती. यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांना तेथे पाठविण्यात आले. भुयारात पटेल इंजिनियरिंगचे 21 तर एनएचपीसीचे 6 यांच्यासह एकूण 27 कामगार अडकून पडल्याची भीती आहे. पश्चिम बंगालमधून गॅसप्रतिबंधक उपकरणांसोबत एक विशेष बचावपथक बोलाविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तमलिंग यांनी दिली आहे. बचाव पथक गॅस मास्क परिधान करत कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

बचावासाठी जोरदार प्रयत्न : एनएचपीसी

तीस्ता जलविद्युत प्रकल्पात अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. भुयारात एकूण 25 कर्मचारी अडकून पडले होते, ज्यातील 10 जणांचा मृत्यू झाला असल्याचे एनएचपीसीकडून सांगण्यात आले.  समरडुंगमध्ये एनएचपीसीच्या तीस्ता स्टेज 6 जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या हेड रेस भुयाराच्या आत दुर्घटना घडली. खडकांमधील मिथेन गॅस अचानक उत्सर्जित होत मोठा धूर आणि विषारी वायू बाहेर पडला होता.

आर्थिक मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील भुयार प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या जीवितहानीवर दु:ख व्यक्त केले आणि पंतप्रधान राष्ट्रीय दिलासा निधीमधून प्रत्येक मृत कामगाराच्या परिवाराला 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

 

 

 

Comments are closed.