केरळच्या इडुक्कीमध्ये भूस्खलन, एकाचा मृत्यू

मंडळ/इडुक्की

केरळच्या इडुककी जिल्ह्यातील अदिमाली क्षेत्राच्या मन्नमकंडम येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनाचा एकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग-85 च्या रुंदीकरण कार्यानजीक झाली असून यामुळे कमीतकमी 8 घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. लक्षमवीडू उन्नाथी कॉलनीतील रहिवासी 48 वर्षीय बिजू असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी संध्या गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॉलनीत 22 घरे होती. भूस्खलनाचा धोका पाहता प्रशासनाने शनिवारी संध्याकाळीच सर्व परिवारांना मदतशिबिरांमध्ये पाठविले होते, परंतु बिजू आणि संध्या हे रात्री घरी परतले होते. रात्री 10.30 वाजता अचानक भूस्खलन होत अनेक घरांवर माती अन् दगडांचा ढिगारा कोसळला. बिजू आणि संध्या दोघेही ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते.

रस्ता रुंदीकरणामुळे धोका

महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरक्षा उपाययोजनांशिवाय केले जात आहे. पर्वतावरून माती हटविताना  सुरक्षा भिंत उभारण्यात आली नाही. धोका असूनही काम जारी ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनीच शनिवारी  पर्वताला भेगा पडल्याचे प्रशासनाला कळविले होते. प्रशासनाने  लोकांना स्थलांतर करण्यास सांगितले होते, परंतु महामार्गाचे काम रोखण्यात आले नव्हते.

Comments are closed.