अंदमान समुद्रात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठा

समुद्रात हाती लागला खजिना : कच्च्या  तेलाच्या आयातीवरील निर्भरता संपण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अंदमाननजीक खोल समुद्रात भारताने मोठा खजिना शोधला आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या स्वरुपातील हा खजिना प्राप्त करण्यासाठी भारताने संशोधनासह खोल समुद्रातून तो बाहेर काढण्याची तयारीही सुरू केली आहे. अंदमानच्या समुद्रात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा आढळून आल्याची माहिती केंद्रीय पेट्रेलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. या साठ्यामुळे भारताची ऊर्जेची गरज पूर्ण होणार असल्याचे मानले जात आहे.

हा पेट्रोलियम साठा अलिकडेच गुयाना येथे मिळालेल्या कच्च्या तेलाच्या साठ्याइतकाच असल्याचा अनुमान व्यक्त होत आहे. या संशोधनाचा अनुमान खरा ठरला तर भारताच्या जीडीपीचा आकार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

भारत सध्या स्वत:च्या गरजेच्या 85-86 टक्के कच्चे तेल इतर देशांमधून आयात करतो. भारत सध्या 42 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करत आहे. परंतु इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाचा प्रभाव कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर अन् दरावर पडण्याची दाट शक्यता आहे. भारत मध्यपूर्वेतून सुमारे 46 टक्के कच्चे तेल खरेदी करतो. तर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संकटामुळे हे कच्चे तेल महागणार आहे. याचा थेट प्रभाव भारताच्या 8 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कच्चे तेल आयात बिलावरही दिसून येणार आहे.

तेल अन् वायू साठ्याचा आकार

केंद्रीय मंत्री पुरी यांच्यानुसार अंदमानच्या समुद्रात असलेला कच्चे तेल अन् नैसर्गिक वायूचा साठा हा अलिकडेच गुयाना येथे आढळून आलेल्या साठ्याइतकाच असल्याचे वाटत आहे. गुयानामध्ये अलिकडेच 11.6 अब्ज बॅरल कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा मिळाला आहे. या साठ्याचा शोध चीनच्या कंपनीसोबत मिळून गुयाना सरकारने लावला आहे. या साठ्यानंतर गुयाना कच्च्या तेलाच्या उत्पादनात आघाडीवर पोहोचू शकतो. याप्रकरणी गुयाना सध्या 17 व्या स्थानावर आहे. भारताचा तेलसाठा देखील सुमारे 12 अब्ज बॅरलचा असल्याचे मानले जात आहे.

भारताला होणार लाभ

जर हा कच्च्या तेलाचा साठा आमच्या अनुमानानसार असल्यास भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण होण्यासह अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले आहे. सध्या भारताच्या जीडीपीचा आकार सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर्स आहे. या कच्चे तेलसाठ्यामुळे हा आकार 20 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. सध्या या कच्च्या तेलसाठ्यावर संशोधन अन् तो बाहेर काढण्याच्या पद्धतींवर काम जारी आहे. या कच्च्या तेलसाठ्यामुळे अर्थव्यवस्थेला दीर्घ कालावधीत मोठा लाभ होणार आहे.

Comments are closed.