Larur news – बाथरुम कुठंय विचारल्यानं बार मालकानं पाळीव कुत्रं अंगावर सोडलं, हाता-पायाचे लचके तोडल्याने दोघे जखमी

निलंगा शहरातील एमआयडीसी हद्दीत असलेल्या एका बार मालकाने व त्याच्या मुलाने ग्राहकांना काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण केले. तसेच पाळीव कुत्रा अंगावर सोडले. कुत्र्याने हाता-पायाचे लचके तोडल्याने दोघे गंभीर जखमी झाले असून याबाबत बार मालकाच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप अण्णाराव पिटले, मेघनाथ विरनाथ पिटले (दोघे रा. लांबोटा ता. निलंगा) आणि त्यांचा मित्र दिलीप सूर्यवंशी (रा. शिवाजी नगर, निलंगा) असे तिघे मिळून बँक कॉलनी रोड निलंगा येथील साबदे बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर बारचे मालक रोहित साबदे यांना झालेले बिलही दिले. नंतर बाथरुम कोठे आहे असे विचारले असता त्यांनी शिवीगाळ करत ही काय सार्वजनिक जागा आहे का? तुम्ही सर्वजण बाहेर जाऊन लघवी करा असे म्हणत काठीने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच पाळलेला कुत्रा दोघा भावांच्या अंगावर सोडला.
कुत्र्याने एकाच्या डाव्या हाताचे व गळ्याला तर दुसऱ्याच्या डाव्या हाताचे लचके तोडले. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बार मालकावर विविध कलमान्वये निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी करत आहेत.
Comments are closed.