शेवटचा सक्रिय दहशतवादी मारला गेला
लतीफ भटच्या खात्म्याद्वारे सुरक्षा यंत्रणांना मोठे यश
वृत्तपत्र/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम या सीमावर्ती भागात लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेचा शेवटचा सक्रीय दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याला कंठस्नान घालण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीने हे यश मिळविले. कुलगाम जिल्ह्यातील एका मशिदीत तो लपून बसला होता. तेथून त्याने सातत्याने सुरक्षा सैनिकांवर गोळीबार चालविला होता. या मशिदीला केंद्रीय राखीव पोलिसांच्या तुकडीने घेराव घातला आणि त्यानंतर त्याला ठार करण्यात आले. तो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा शेवटचा सक्रीय दहशतवादी होता.
11 नोव्हेंबरला भट आणि त्याचा सहकारी उस्मान निसार दर यांनी सीआरपीएफ च्या एका चौकीवर हल्ला करुन तीन पोलिसांना जखमी केले होते. हल्ल्यानंतर या दोन्ही दहशतवाद्यांनी पलायन केले. मात्र, या घटनेनंतर एका आठवड्यात सीआरपीएफने त्यांना शोधून काढले आणि त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. भट हा गेल्या सहा वर्षांपासून काश्मीर घाटीत सक्रीय होता.
मोठे शोध अभियान
या दोन दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सीआरपीएफच्या तुकड्यांनी मोठे शोध अभियान गेले पाच दिवस चालविले होते. उस्मान निसार दर याला मंगळवारी ठार करण्यात आले. त्यानंतर भट याचा शोध घेण्यात आला. तो मशिदीत लपून बसला असल्याची माहिती गुप्तचरांनी पुरविल्यानंतर त्याला घेरण्यात आले. मशिदीत न शिरता त्याला बाहेरुन उडविण्यात आले, असे प्रतिपादन पोलिसांनी केले आहे.
शरण येण्यास नकार
पोलिसांनी चारी बाजूंनी मशिदीला घेरल्यानंतर भट याला शरण येण्याचे आवाहन केले. तथापि, त्याने ते धुडकावले. त्याने पोलिसांवरच मशिदीच्या आडून गोळीबार केला. ही चकमक बुधवारी जवळपास सात तास चालली. त्यानंतर त्याला टिपण्यात आले आहे. त्याचा एन्काऊंटर हे सीआरपीएफचे अत्यंत महत्वाचे यश मानले जात आहे. आता काश्मीर खोऱ्यात कुख्यात असा लष्कर ए तोयबाचा कोणताही दहशतवादी जिवंत राहिलेला नाही, असे सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
केली होती रेकी
सीआरपीएफच्या चौकीवर हल्ला करण्यापूर्वी दोन्ही दहशतवाद्यांना चौकीच्या परिसराची रेकी केली होती. मात्र, ते रेकी करत असतानाचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे सीआरपीएफला समजले होते. याच चित्रणाच्या आधारावर पुढे त्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली आहे.
Comments are closed.