‘लाडक्या बहिणीं’ना केवायसीसाठी शेवटची संधी

लाडक्या बहिणींना ई-केवायसीशिवाय लाभ मिळणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी अविवाहित, वडील नसलेल्या, विधवा किंवा घटस्फोटित महिलांसाठी नव्याने ई-केवायसीची सोयही पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.

अनेक महिलांनी मोबाईलवर किंवा सेवा केंद्रांवर जाऊन घाईघाईने केवायसी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणात सरव्हरवर लोड आल्याने ओटीपी न मिळणे, फॉर्म सबमिट न होणे, अशा अडचणींना महिलांना सामोरे जावे लागले. त्यातच अपुऱ्या डिजिटल ज्ञानामुळे अनेकांनी फॉर्ममध्ये चुकीची उत्तरे दिल्याने त्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे ही दुरुस्ती करण्याची शेवटची संधी सरकारने लाडक्या बहिणींना दिली आहे.

पूर्वी पोर्टलवर दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ‘होय, होय,’ अशी द्यायची होती. हे प्रश्न नीट न समजल्याने अनेकांनी चुकीने ‘नाही, नाही’, अशी उत्तरे दिली आणि त्या आपोआप अपात्र ठरल्या. शासनाने आता सुधारित फॉर्ममध्ये दोन नवीन प्रश्न दिले आहेत. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ‘नाही, नाही,’ अशी द्यायची आहेत. योग्य जातप्रवर्गाची नोंदही अचूक करणे आवश्यक आहे.

विधवा महिलांनी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटितांनी घटस्फोट प्रमाणपत्र, तर वडील नसलेल्या मुलींनी वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत जोडून संपूर्ण फॉर्म 31 डिसेंबर 2025 पूर्वी अंगणवाडी सेविकांकडे जमा करणे बंधनकारक आहे. अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने लाभार्थ्यांनी तातडीने दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments are closed.