लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार

लातूर: हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी सुपरवायजर म्हणून काम करणाऱ्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. प्रमोद घुगे याला अखेर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. आरोपी डॉक्टरला हरिद्वारमधून पोलिसांनी अटक केली आहे. आठ दिवसांपूर्वी बाळू डोंगरेची हत्या झाली होती आणि आरोपी डॉक्टर फरार झाला होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.

लातूर शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध किडनी रोग तज्ञ म्हणून डॉ. प्रमोद घुगे यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या आयकॉन हॉस्पिटल येथील सिक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे याची आठ दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आर्थिक देवाणघेवाणीवरून डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये वाद होता. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाला आणि यात बाळू डोंगरे यांच खून झाला.

डॉ. प्रमोद घुगे हे बाळू डोंगरे याला ठरवून दिलेले पैसे देत नव्हते. यावरून बाळू डोंगरे आणि प्रमोद घुगे यांच्यात सातत्याने वाद होते. 11 डिसेंबरच्या मध्यरात्री बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी डॉ. आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला. यात डॉ. प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंढे यांनी बाळू डोंगरे याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचा बनाव रचला

गाडीवरून पडून अपघात झाल्याचा बनाव करत डॉक्टरने पोलिस आणि कुटुंबीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबीयांचा आणि पोलिसांचा संशय बळावला. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण बाळू डोंगरे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे वळ दिसून येत होते. अपघात झाल्यानंतर असल्या पद्धतीचा मार लागत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. बाळू डोंगरे यांचा खून झाला असल्याची खात्री नातेवाईकांनी घटनाक्रम लक्षात घेऊन केली. त्यानंतर डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.

याच काळात डॉ. प्रमोद घुगे आणि त्याचा सहकारी अनिकेत मुंडे हे लातूर येथून फरार होण्यात यशस्वी झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली होती. हरिद्वार येथील पोलिसांच्या पथकाला डॉ. घुगे यांना अटक करण्यात यश आलं आहे. यातील दुसरा एक आरोपी अद्याप फरार आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.