लातूरमधील भाजपचे 28 बंडखोर ठाम; निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार कायम…

लातूर : शहर भाजपामध्ये तिकीट वाटपावरून उसळलेली नाराजी अद्यापही शमलेली नसून, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंड अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. “आम्हीच खरे भाजपवाले” असा ठाम दावा करत अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले असून, आजही ते निवडणुकीला सामोरे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजप नेतृत्वाने बंडखोरी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले असून, तब्बल 28 भाजप बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवत थेट आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.

तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप बंडखोरांकडून केला जात आहे. जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून 30 ते 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे प्रमुख स्वयंसेवक आणि जुने कार्यकर्ते एकत्र येत भाजपच्या विरोधात स्वतंत्र आघाडी उघडण्याच्या हालचाली सुरू आहेत. “बाहेरच्या पक्षातून आलेल्या अनेक ‘आयाराम’ उमेदवारांना तिकीट देण्यात आले, तर आमच्यावर अन्याय करण्यात आला,” असा आरोप बंडखोरांनी केला.

विशेष म्हणजे, ज्या प्रभागांमध्ये भाजपचे पारंपरिक प्राबल्य आहे, त्या ठिकाणीही इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप होत आहे. “त्या ठिकाणी भाजपाला आम्ही का दिसलो नाही?” असा थेट सवाल बंडखोर कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. याच नाराजीतून काल झालेल्या बैठकीनंतर निवडणुकीला सामोरे जाण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

आज 28 बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिंदे सेना तसेच विविध सामाजिक संघटनांशी चर्चा करून परस्पर सहकार्य घेत निवडणूक लढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते नितीन शेटे यांनी दिली आहे.

भाजप बंडखोरांच्या या ठाम भूमिकेमुळे लातूर भाजपातील अंतर्गत गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता असून, महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. लातूरमध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजपनं 36 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यानच्या काळात भाजपच्या काही नगरसेवकांनी बंडखोरी केल्यानं काँग्रेसला लातूरमध्ये सत्ता मिळाली होती. आता 2025 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.