Latur – स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपात रणकंदन, नाव वगळले म्हणून थेट आत्मदहनाचा प्रयत्न
मागील निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवलेल्या भाजपाला लातूरकरांनी या महापालिका निवडणुकीत थेट विरोधी बाकावर बसवले. केवळ दोन स्वीकृत सदस्य निवडण्यातही भाजपातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. अगोदर नाव जाहीर झाले आणि नंतर वगळण्यात आले म्हणून चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
लातूरकरांनी या अगोदर भाजपाला थेट बहुमतात बसवले होते, परंतु अंतर्गत मतभेदांमुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीत गटातटामुळे पक्षात फूट पडली आणि काँग्रेसचा महापौर झाला. या निवडणुकीत लातूरकरांनी थेट भाजपला नाकारले. पुन्हा काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. परंतु यामधून भाजपने काही धडा घेतला नाही.
२२ नगरसेवक निवडून आले आणि केवळ दोन स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी पुन्हा पक्षात लॉबिंग सुरू झाले. स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य एवढे टोकाला पोहोचले की, पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आलेले नाव अचानक रद्द झाल्याने संतप्त झालेले भाजपचे लातूरमधील पदाधिकारी संजय गिर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर नाव झळकल्यानंतर ऐनवेळी ते वगळण्यात आल्याने संजय गिर यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. घटनास्थळावरील कार्यकर्ते आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु भाजपाची पुरती बदनामी सुरू झाली.
Comments are closed.