आधी मारहाण केली, नंतर तोंड दाबून संपवलं, शेती विकायला विरोध करणाऱ्या आईचा खून करून मृतदेह शेतात

लातूर: लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातुरमधील रेणापूर या ठिकाणी शेती विकायला विरोध करत असलेल्या वयोवृद्ध आईचा खून ( latur Crime News) करून मुलानेही आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात काल (शुक्रवारी, ता 8) मृत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ( latur Crime News)

नेमकं काय घडलं?

काकासाहेब जाधव आपल्या आईकडे वारंवार शेत विकण्यासाठी बोलत होते. मात्र, त्याला त्यांच्या आईने विरोध केला होता. त्यामुळे समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय 80) यांना काकासाहेब यांनी जबर मारहाण केली, त्यानंतर त्यांचं तोंड दाबून जीव घेतला. त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात आईचा मृतहेद पुरला. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात मृत काकासाहेब जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. समिंद्रबाई जाधव यांना चार मुली व एक मुलगा होता. आई जमीन विकू  देत नसल्याने तिचा खून केला अन् स्वतः झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाच्या मृत्यूनंतर काही तासांमध्ये आईचा मृतदेह आढळला

काकासाहेब जाधव (वय 48) यांनी रेणापूर पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 4 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, आणि माहिती घेतली. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या आईचाही मृतदेह गावातील शेतात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

माय-लेकावर एकत्र झाले अंत्यसंस्कार

मुलगा काकासाहेब वेणुनाथ जाधव व आई समिंद्रबाई वेणुनाथ जाधव यांच्या मृतदेहाची रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दोन्हीही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://www.youtube.com/watch?v=nayesvt9nnu

आणखी वाचा

Comments are closed.