Latur horrific accident in latur 37 passengers injured in ST Bus overturns


लातूर : काही दिवसांपूर्वी लातूर महामार्गावर एका भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा लातूर महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये तब्बल 37 एसटी प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला असून या अपघाताची तीव्रता समोर आले आहे. दरम्यान, या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी तसेच स्थानिकांकडून ठोस पाऊले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. (Latur horrific accident in latur 37 passengers injured in ST Bus overturns)

हेही वाचा : Supplementary Demands : पंतप्रधान आवास योजनेसाठी 3 हजार 752 कोटी, 6 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर 

सोमवारी (3 मार्च) रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटीजवळ एसटीचा भीषण अपघात घडला. अहमदपूरहून लातूरकडे एक एसटी बस चालली होती. यावेळी नांदगाव पाटीजवळ पुढे चाललेल्या एका दुचाकीस्वाराला चुकविताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लेनवर जाऊन पलटी झाली. त्यानंतर ही एसटी बस 70 फूट फरफटत गेली. या अपघातात अंदाजे 37 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामध्ये काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला. तर, काहींचा हात तसेच हाताची बोटांनादेखील गंभीर इजा झाल्याचे समोर आले. जखमींना रुग्णवाहिकेने लातूर येथील नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी तसेच चाकूर पोलिस दाखल झाले. तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्यापासून चाकूर तालुक्यातील आष्टामोड आणि नांदगाव पाटी या जागा अपघातासाठी अतिधोकादायक झोन म्हणून ओळखले जाते. या जागेवर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून आपला जीव गमावला आहे.

भरधाव वाहनाच्या घडकेत एकाचा मृत्यू

महिनाभरापूर्वीच म्हणजेच रविवारी (9 फेब्रुवारी) लातूर महामार्गावरील उदगीरजवळ एका भरधाव वाहनाने दोघांना उडवल्याची घटना घडल्याचे समोर आले. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात उदगीर-नळेगाव-लातूर महामार्गावरील लोहारा गावाजवळ झाला. यामध्ये 30 वर्षीय दीपक मठपती यांचा मृत्यू झाला असून 17 वर्षीय विनायक मठपती गंभीर झाला होता. त्यांच्या नातेवाईकाने सांगितले की, दोघेही लातूरच्या दिशेने जात होते. यावेळी रविवारी रात्री 7.30 ते 8 वाजताच्या सुमारास लोहारा गावाजवळ समोरून येणारा भरधाव अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.



Source link

Comments are closed.