Latur News – अंगणवाडी सेविकेचा विनयभंगप्रकरणी आश्रमशाळेच्या संस्थाचालकास अटक
अंगणवाडी सेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी वसंतराव नाईक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा संस्थाचालक आणि मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालकाला अटक करण्यात आली आहे. बाबुराव किसन जाधव असे अटक केलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
पीडित महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करून आपली उपजीविका करते. आरोपीने महिलेला फोन करून अश्लील संभाषण करत आपल्या पत्नीचे नाव सांगून मानस लॉजवर येण्यास सांगितले. तसेच तू निराधार तुला आधार देतो, असे म्हणाला. पीडितेने आई-वडील आणि भावाला याबाबत सांगत मुरुड पोलिसात याबाबत तक्रार नोंदवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांनी तांदूळजा बीटचे बीट अंमलदार आर.जे. चव्हाण आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल साठे यांना सूचना दिली. त्यानुसार चव्हाण आणि साठे यांनी संबंधित आरोपी बाबुराव जाधव यास लातूर येथील मानस हॉटेलमधील रूम नं 205 मधून अटक करत मुरुड पोलीस ठाण्यात आणले.
याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. संबंधित गुन्ह्याचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नामदेव उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर जे चव्हाण व विठ्ठल साठे हे करत आहेत.
Comments are closed.