पेपरफुटीचा असाही ‘लातूर पॅटर्न’, उत्तरपत्रिकेला चक्क पाय फुटले, केंद्राबाहेर गेली! परीक्षेच्या नावाखाली यशवंतराव चव्हाणांच्या नावाला बट्टा

>> अभय मिरजकर

एकेकाळी संपूर्ण देशात उत्तम गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे लातूर आता पेपरफुटीसाठी कुख्यात झाले आहे. ‘नीट’ पेपरफुटीलाही लाजवणारा गैरप्रकार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत समोर आला आहे. पर्यवेक्षक झोपलेले असताना गैरहजर परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकेला चक्क पाय फुटले! केंद्रातून ही उत्तरपत्रिकाच गहाळ झाली. प्र-कुलगुरूंच्या अचानक भेटीत ही ‘पेपरफेरी’ उघडकीस आली. प्र-कुलगुरूंनी सूचना देऊनही विद्यापीठाने नेमलेल्या बहिस्थ पर्यवेक्षकांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली नाही, हे विशेष! अखेर नांदेड येथील विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलपेवार यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. परंतु पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.

जळकोट येथील महात्मा फुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे परीक्षा केंद्र आहे. १० जून रोजी या केंद्रास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, नांदेड येथील विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी भेट दिली. एका दालनात डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे पाहणीसाठी गेले. या दालनावर पर्यवेक्षक म्हणून गोविंद मुसळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. दालनात ३० विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था होती. त्यामुळे परीक्षा विभागाकडून ३० उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात २७ विद्यार्थी परीक्षा देत होते, तर तीन विद्यार्थी अनुपस्थित होते.

उत्तरपत्रिका शोधण्याचे नाटक

उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे उघड होताच परीक्षा केंद्रावर ‘शोधाशोध’ नाटक सुरू झाले. दालन, दालनाच्या बाहेर, बेंचच्या खाली, स्वच्छतागृहात, बाहेर पटांगणात ‘शतपावली’ करत संयोजक, सहसंयोजक, परीक्षा प्रमुखांनी उत्तरपत्रिका शोधली. काही वेळानंतर उत्तरपत्रिका सापडत नसल्याचे त्यांनी प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांना येऊन सांगितले.

बहिस्थ पर्यवेक्षकाला तत्काळ हाकलले

उत्तरपत्रिकाच केंद्रावरून गहाळ झाल्या प्रकरणात विद्यापीठाने नेमलेले वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक सूर्यकांत माळहिप्परगे यांची तत्काळ परीक्षेच्या कामातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पाहणीसाठी आलेले वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलपेवार यांनी स्वतः सर्व हेराफेरीची तक्रार केली. मात्र पोलिसांनी या तक्रारीची अद्यापही दखल घेतली नाही.

२५ कॉपी प्रकरणे कारवाईसाठी विद्यापीठाकडे

जळकोटच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कॉपी प्रकरण विद्यापीठ नियमाप्रमाणे प्रक्रिया करून एकूण २५ प्रकरणे पुढील कारवाईसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड येथील विभागीय केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत.

शिल्लक उत्तरपत्रिकांपैकी एक गायब!

२७ परीक्षार्थीना उत्तरपत्रिका वाटून तीन उत्तरपत्रिका पर्यवेक्षक गोविंद मुसळे यांच्याकडे शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांना दोनच उत्तरपत्रिका आढळल्या तर २६१०३५७५३ या क्रमांकाची उत्तरपत्रिका गहाळ झालेली होती. यासंदर्भात त्यांनी मुसळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी चक्क कानावर हात ठेवले. प्रा. बिसेन यांनी उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे केंद्र संयोजक रामदास नागरगोजे, सहसंयोजक एस. आर. दराडे, परीक्षा प्रमुख हनुमंत गिते यांना सांगितले.

अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी

गोविंद मुसळे पर्यवेक्षक असलेल्या दालनातील उमेश मन्मथप्पा ब्याकोडे, श्रीराम प्रल्हाद मालुरे आणि तुषार बालाजी इंद्राळे हे तीन परीक्षार्थी गैरहजर होते. १० जून रोजी प्रथम सत्रात हे परीक्षार्थी गैरहजर दिसत असले तरी त्यांनी यापूर्वीचे पेपर दिले आहेत. केंद्र संयोजक रामदास नागरगोजे, सहसंयोजक एस.आर. दराडे, परीक्षा प्रमुख हनुमंत गिते तसेच पर्यवेक्षक गोविंद मुसळे, केंद्र प्रमुख चंद्रशेखर कळसे या सर्वांच्या उडवाउडवीच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या प्रा. बिसेन यांनी वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक सूर्यकांत दत्तात्रय माळहिप्परगे यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना केली. परंतु माळहिप्परगे यांनी कोणतीही तक्रार केली नाही.

Comments are closed.