Latur News – एक लाखांच्या वाळूसह तब्बल 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूचा साठा करून अवैधरित्या विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेली अंदाजे 20 ब्रास वाळू धाड टाकून पकडण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक लाख रुपये किंमतीच्या वाळूसह 1 कोटी 46 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कारवाईत एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी चंद्रकांत रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग चाकुर यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी त्यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले होते. या पथकाने खासगी वाहनाने घटनास्थळी जात छापा मारला. यावेळी मौजे लातूर-नांदेड रोडच्या पश्चिम बाजूस राळगा शिवारात असलेल्या सखाराम नामदेव राठोड याच्या शेतात अंदाजे 20 ब्रास वाळू आढळून आली. या वाळूचा अवैधरित्या साठा करुण ठेवण्याता आला होता. पोलिसांनी सर्व वाळू जप्त केली. त्याचबरोबर वाळू भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 जेसेबी, 4 हायवा टिप्पर, 1 बोलेरो, आरोपींचे मोबाईल आणि 21,500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 46 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आकनगीरे यांच्या फिर्यादीवरून 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये प्रशांत महेद्र आगलावे, ओमकार सुग्रीव जाभाडे, सगमेश्वर निवृत्ती नरवटे, संतोष सतिष शेळके, सखाराम नामदेव राठोड, शेख फत्तूसाब इस्माइल, प्रशांत उत्तम नाटे, भैयासाहेब बळीराम कांबळे, संतोष कुलाल, सोमनाथ माळी, दस्तगीर पठाण, संगम राजकुमार कदम यांचा समावेश आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर अहमदपूर यांच्याकडे देण्यात आला आहे.
Comments are closed.