लातूर मारहाण प्रकरण! पोलिसांनी दोन जणांना घेतलं ताब्यात, फरार आरोपींच्या शोधासाठी पथकं रवान

आळशी: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केला होता. यावरुन अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समोर तीव्र संताप व्यक्त केला. ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले होते. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणने (Suraj Chavan) ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान, या घटनेप्रकरणी लातूर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र ते कोण आहेत हे समोर आले नाही. लातूर पोलिसांची तीन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. सुनील तटकरे हे काल लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना  दिलं.निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा… असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, एकूण तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. आज संध्याकाळ पर्यंत आणखीन काही आरोपी हाती लागण्याची शकता आहे.

सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे अजित पवारांचे आदेश

लातूरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज अजित पवारांनी तातडीने सूरज चव्हाण यांना बोलावले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जाते. दरम्यान, अजित पवारांनी आज दुपारी 12.11 वाजता लातूरमधील घटनेचा कडक शब्दात निषेध केला. त्यानंतर 12.59 वाजता लगेच दुसरे ट्विट करत सूरज चव्हाण यांना तातडीने पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar On Suraj Chavan: अजितदादांनी 12.11 वाजता कडक शब्दात सांगितले; 12.59 वाजता सूरज चव्हणांचा राजीनामाच मागितला, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.