शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धास जाळलं, उलगडलं सत्य

लातूर : एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) उघडकीस आली. पोलिसांनी (Police) घडल्या प्रकाराचा अवघ्या 24 तासांत छडा लावल्याने या घटनेचं सत्य उलगडलं आहे. डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून करण्यात आल्याची खळबजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृताचे वय अंदाजे (35) वर्षे असल्याचे सांगण्यात येत होते. वाहनात सापडलेल्या काही वस्तूंवरून हा मृतदेह औसा तांडा येथील गणेश चव्हाण याचा असल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान गणेश चव्हाण याच्या कॉल डिटेल्स तपासण्यात आल्या. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आणि अखेर अवघ्या 24 तासांत गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून तो फरार झाल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. दरम्यान, याप्रकरणी, पोलिस पुढील तपास करत असून आरोपीविरोधात खून, फसवणूक व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पैशासाठी रचलेला अमानुष कट

औसा तांडा येथील रहिवासी असलेला गणेश चव्हाण एका खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. अनेक आर्थिक व्यवहार अडचणीत आले होते, फ्लॅटचे हप्तेही थकले होते. या संकटातून सुटका मिळवण्यासाठी त्याने आधी एक कोटी रुपयांचा विमा उतरवला आणि नंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. तुळजापूर टी-पॉईंट परिसरात लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव (वृद्ध) याला त्याने गाडीत बसवले. पुढे त्याचा खून करून मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवण्यात आला आणि गाडीला आग लावण्यात आली. आपणच मृत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपीने स्वतःचे कडे मृतदेहाजवळ ठेवले होते. मात्र, काही संशयास्पद बाबींमुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आणि अखेर गणेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागला. या घटनेत निष्पाप वृद्धाचा हकनाक बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

आणखी वाचा

Comments are closed.