लॉरेन्सच्या भावाचे भारतात प्रत्यार्पण

11 दिवसांसाठी एनआयए कोठडीत रवानगी : सलमान खानच्या निवासावर गोळीबार केल्याचा आरोप,बाबा सिद्दीकी, मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणीही ‘वॉन्टेड’

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला बुधवारी अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याला बुधवारी दिल्ली विमानतळावर आणताच एनआयएने ताब्यात घेतले. त्यानंतर पटियाला न्यायालयात हजर केले असता त्याला 11 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. अनमोलला अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तो भारतातील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वॉन्टेड यादीत आहे. एनआयएने त्याच्या अटकेवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

अमेरिकेतून एकूण 200 जणांचे प्रत्यार्पण करण्यात आले असून त्यात भारतातील तिघांचा समावेश आहे. अनमोल व्यतिरिक्त दोघे पंजाबचे आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप कळलेला नाही. गँगस्टर अनमोल हा एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेतील एक वॉन्टेड आरोपी आहे. तसेच गेल्यावर्षी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. त्याव्यतिरिक्त अनमोलचे नाव 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहे.

एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 19 नोव्हेंबर रोजी आयजीआय विमानतळावर अनमोलला अटक केली. कडक सुरक्षेत त्याला थेट पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला रिमांड दिला.  अनमोल बिश्नोई याला पटियाला हाऊस कोर्टाने 11 दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले आहे. एनआयएने त्याचा ताबा मिळविण्यासाठी अनमोलची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण सुनावणी इन-कॅमेरा करण्यात आली. याप्रसंगी मीडियासह बाहेरील लोकांना प्रवेश नव्हता.

अनमोल बिश्नोई याच्याविरुद्ध 35 हून अधिक खून, 20 अपहरण, खंडणी, धमक्या आणि हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये थेट सहभाग असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. सलमान खानला लॉरेन्स टोळीकडून धमक्या मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने सलमानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा दिली होती. 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजता मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलवर बाबा सिद्दीकीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स टोळीने स्वीकारली होती. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 26 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अनमोल, शुभम लोणकर आणि झीशान मोहम्मद अख्तर यांना वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येतही या टोळीचा सहभाग उघड झाला होता.

Comments are closed.