इटलीतील मिटेनी कंपनीशी लक्ष्मी ऑर्गेनिकचा संबंध नाही; वरिष्ठ उपाध्यक्ष दिपक पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इटलीतील मिटेनी कंपनी आणि लोटेतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी यांचा काहीही संबंध नसून दोन्ही भिन्न कंपन्या आहेत. इटलीतील मिटेनी कंपनी कर्जबाजारी झाल्यानंतर लिलावात त्या कंपनीची यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञान आम्ही घेतले आहे. लोटे येथे पीफासचे उत्पादन करताना आम्ही सुरक्षेचे काटेकोर नियमन करत आहोत असे लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले.

दिपक पाटील यांनी पुढे सांगितले की, लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने सर्व आवश्यक परवानग्या घेऊन लोटे येथे कारखाना सुरू केला आहे. ज्यांनी कंपनीच्या विरोधात आंदोलन केली त्यांच्या निवेदनातील प्रश्नांना आम्ही लेखी उत्तरे दिली आहेत. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या स्वरूपाचे सादरीकरण करण्यात आले. कंपनीत उत्पादन झाल्यानंतर टाकाऊ कचरा आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी टॅंकरद्वारे तळोजा येथे पाठवला जातो. रस्त्यात कुठे अपघात झाल्यास लोटे आणि महाड येथे आमची दोन पथके तैनात असतात ती तात्काळ घटनास्थळी पोहचतील असा विश्वास दिपक पाटील यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पात अत्याधुनिक क्लोज्ड लूप प्रणालीचा वापर केला जातो त्यामुळे घातक घटक बाहेर पडत नाहीत. सर्व प्रक्रिया डिजिटल ट्रेसेबिलिटी द्वारे नियंत्रित केल्या जातात त्यामुळे पारदर्शकता येते असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी उत्पादन विभागाचे अध्यक्ष राजेश नाईक, सुरक्षा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय वैशंपायन उपस्थित होते

Comments are closed.