10 एप्रिलनंतरच नेतृत्व बदलेल
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसंबंधी विचारविमर्श केला जात आहे. राज्यसभेची निवडणूक 16 मार्चला होणार आहे. तथापि, नितीश कुमार हे राज्यसभा सदस्यत्वाची शपथ 10 एप्रिलला घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे तो पर्यंत तेच मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत. त्यानंतर, नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृतवात नवे सरकार स्थापन केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
बिहारमध्ये आता भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. या पक्षात त्यादृष्टीने हालचालींना प्रारंभही करण्यात आला आहे. ही शक्यता खरी ठरली, तर इतिहासात प्रथमच या राज्याला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री मिळणार आहे. नितीश कुमार यांच्या राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचेही स्पष्टीकरण संयुक्त जनता दलाने दिले आहे. त्यांना राज्यसभेत पाठविण्याच्या योजनेसंबंधी बऱ्याच काळापासून पक्षात चर्चा होत होती. तथापि, चार महिन्यांपूर्वी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व नितीश कुमार यांनीच केले आणि त्यांच्या नेतृत्वात प्रचंड यश या आघाडीला मिळाले. त्यामुळे त्यांनीच काही काळासाठी मुख्यमंत्री व्हावे, असा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यांची प्रकृती आणि वय पहाता त्यांना राज्यसभेत पाठविण्यात येत आहे. त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर राज्यात नव्या सरकारची स्थापना करण्यात येणार आहे.
सत्तावाटपाचे नवे सूत्र
नव्या सरकारचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे येईल. या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल. संयुक्त जनता दलाला दोन उपमुख्यमंत्रीपदे दिली जातील. गृहमंत्रीपद नव्या मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. तसेच मंत्रीपदांपैकी 14 मंत्रीपदे संयुक्त जनता दलाला तर 13 मंत्रीपदे भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत. याचाच अर्थ असा की, सध्या सत्तावाटपाचे जे सूत्र आहे, तेच पुढे दोन पक्षांमध्ये आदलाबदली करुन चालविले जाणार आहे, अशी माहिती आघाडीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
नितीश कुमार मार्गदर्शक
नितीश कुमार राज्यसभेत जाणार असले तरी, राज्यातील राजकारणावर त्यांचे लक्ष राहणार आहे. ते प्रामुख्याने पाटण्यातच वास्तव्य करतील. संसद अधिवेशन काळात ते दिल्लीत असतील. नवे राज्य सरकार त्यांच्या मार्गदर्शनात काम करेल. ते केंद्रीय मंत्रीपद स्वीकारतील का, या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. तथापि, सध्या तरी तो विषय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. चित्र 10 एप्रिलनंतर स्पष्ट होईल.
निशांत कुमार यांचा प्रवेश
नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे लवकरच राजकारणात अधिकृत प्रवेश करतील. प्रथम ते संयुक्त जनता दलाचे सदस्य होतील. त्यानंतर त्यांना बिहारचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कालांतराने त्यांच्याकडे संयुक्त जनता दलाचे नेतृत्वही दिले जाईल, अशी चर्चा आहे. एकंदर, येत्या एक-दोन महिन्यांच्या काळात बिहारमध्ये मोठे राजकीय परिवर्तन होऊन नवयुगाचा प्रारंभ होणार आहे.
Comments are closed.