भारतीय क्रिकेटपटूचे निधन; क्रीडा विश्वात शोककळा, असा होता कारकीर्दीचा प्रवास

माजी क्रिकेटपटू निकोलस सलदान्हा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. जरी त्यांना भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती, तरी महाराष्ट्रासाठी त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये लक्षणीय कामगिरी केली.

निकोलस सलदान्हा हे त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि प्रभावी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. महाराष्ट्रासाठी खेळलेल्या 57 फर्स्ट क्लास सामन्यांत त्यांनी एकूण 2066 धावा केल्या. यात 1 शतकाचा समावेश असून, त्यांचा सर्वोच्च धावसंख्या 142 राहिला. त्यांनी 30.83 च्या सरासरीने धावा केल्या आणि 9 वेळा नाबाद राहिले. उत्तम क्षेत्ररक्षण करताना त्यांनी 42 झेलही टिपले.

फलंदाजीशिवाय सलदान्हा यांनी 57 फर्स्ट क्लास सामन्यांत एकूण 138 बळी घेतले. एका डावात त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा 6/41 असा राहिला. त्यांनी 6 वेळा पाच बळींची कामगिरी साध्य केली होती.

निकोलस सलदान्हा यांचा जन्म 23 जून 1942 रोजी नाशिक येथे झाला. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी फक्त महाराष्ट्रासाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. अनेकवेळा आपल्या दमदार लेग ब्रेक आणि गुगली गोलंदाजीने महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांना आपल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले. MCA च्या निवेदनात म्हटले आहे, “निकोलस हे समर्पित आणि प्रतिभावान क्रिकेटपटू होते, ज्यांनी महाराष्ट्रात क्रिकेटसाठी मोठा वाटा उचलला. ते त्यांच्या प्रभावी ऑलराउंड खेळासाठी आणि खेळाडूवृत्ती साठी ओळखले जात.”

Comments are closed.