आपण दृढनिश्चयानुसार आत्मनिर्भरतेकडे जाऊया.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शुल्कसंबंधी प्रतिपादन

वृत्तसंस्था / अहमदाबाद

भारताने आत्मनिर्भरतेच्या मार्गावर जोमाने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. ‘स्वदेशी’ हा आपला जीवनमंत्र झाला पाहिजे. याच मार्गाने भारत अधिकाधिक सामर्थ्यवान होणार असून भारताला आता ही संधी प्राप्त झाली आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीय नागरीकांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असून तशी अधिसूचनाही प्रसारित केली आहे. मात्र, भारताने कोणत्याही दबावात येणार नाही, असे संकेत दिले असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या दौऱ्यावर असताना केलेले हे विधान पाहिले जात आहे.

भारताला ही संधी

भारतात बुद्धीमत्तेची कमतरता नाही. आपण प्रयत्न केल्यास आपली आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. भारताला आज जगाच्या राजकारणात ही संधी प्राप्त झाली आहे. सध्याची परिस्थिती अस्थिर असून भारताने आत्मनिर्भरतेच्या मार्गावर अग्रेसर होण्यातच त्याचे हित आहे. आपली अर्थव्यवस्था आपल्या निर्णयानुसार चालली पाहिजे. आपण अन्य देशाच्या दबावात आल्यास आपले निर्णय स्वातंत्र्य गमावले जाणार असून त्यातून देशाचे मोठे अहित होऊ शकते, अशा अर्थाचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे केले आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारच

कितीही आंतरराष्ट्रीय दबाव आला, तरी मी आणि माझे सरकार भारतातील शेतकरी, छोटे व्यापारी, कारागिर, मत्स्यपालक आणि पशुपालक यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार आहे. या समाजघटकांना संरक्षणाची आवश्यकता आहे. ते संक्षण सरकार त्यांना देणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारताची कृषी बाजारपेठ भारतीय उत्पादकांसाठीच मोकळी राहील, असे प्रतिपादन त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मंगळवारीही त्यांनी याच विधानाचा पुनरुच्चार केला.

अमेरिकेची अट

भारताने  आपली कृषीबाजारपेठ अमेरिकेच्या वस्तूंसाठी मोकळी करावी, अशी अट अमेरिकेने घातली आहे, असे बोलले जात आहे. तसेच भारत रशियाकडून जे तेल विकत घेतो, त्यामुळे रशियाला पैसा मिळतो आणि रशिया युक्रेनशी युद्ध करण्यासाठी सक्षम होतो, असे ट्रंप यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, अशीही अट अमेरिकेकडून घालण्यात आली आहे.

अटी मानण्यास नकार

भारताने मात्र या दोन्ही अटी मानण्यास नकार दिल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार करण्यासंबंधी चर्चा केली जात होती. ती चर्चाही आता थांबली आहे. अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात 25 ऑगस्टला येणार होते. मात्र, ते न आल्याने पुढची चर्चा थंडावल्याचे वृत्त आहे. आज बुधवारपासून अमेरिकेचे भारतावरील 50 टक्के व्यापार शुल्क लागू होत आहे. या सर्व घडामोडी आता निर्णायक वळणार आल्या असून पुढचे काही महिने मोठ्या हालचालींचे ठरणार आहेत. भारत-अमेरिका कोंडी कशी फुटणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.