बांगलादेशच्या निवडून आलेल्या सरकारशी बोलूया!

लष्करप्रमुखांचे स्पष्टीकरण : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मांडली भूमिका : पाकिस्तान-चीन सीमेवरील सुरक्षेबाबतही भाष्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेशातील सत्तापालटावेळी आपण तेथील लष्करप्रमुखांच्या संपर्कात असल्याची कबुली देत आता बांगलादेशमध्ये केवळ निवडून आलेले सरकार सत्तेत आल्यानंतरच सीमावादासंबंधी बोलणी केली जातील, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी सांगितले. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत देशाच्या सर्व सीमांवरील सुरक्षेबाबत चर्चा केली. चीन सीमा आणि म्यानमार सीमेव्यतिरिक्त त्यांनी मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात लष्कराच्या तयारीबद्दलही भाष्य केले.

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आपण हळूहळू दहशतवादाकडून पर्यटनाकडे वाटचाल करत आहोत, असे लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले. वास्तविक नियंत्रण रेषेवरील (चीन सीमा) परिस्थिती संवेदनशील असली तरी सध्या नियंत्रणात आहे. पंतप्रधान मोदींनी या मुद्यावर चिनी नेत्यांशीही चर्चा केली आहे. तिथे आता बफर झोन नाही. सध्या जम्मू आणि काश्मीरमधील 80 टक्के सक्रिय दहशतवादी हे पाकिस्तानस्थित आहेत. 2024 मध्ये मारले गेलेले 60 टक्के दहशतवादी  पाकिस्तानी होते. खोऱ्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत, परंतु आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही लष्करप्रमुखांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

एलएसीवरील परिस्थिती मजबूत

देशाच्या उत्तरेकडील सीमेवर पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचोकमधील एलएसीवरील वाद ऑक्टोबर 2024 मध्ये सोडवण्यात आला, या दोन्ही भागात आता पेट्रोलिंगही सुरू झाले आहे. मी माझ्या सर्व सह-कमांडरना गस्तीबाबत मार्गदर्शन करतानाच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. एलएसीवरील आमची तैनाती संतुलित आणि मजबूत आहे. आम्ही विशेष तंत्रज्ञानाचा समावेश करून उत्तरेकडील सीमेवर आमच्या लष्करी क्षमता वाढवल्या आहेत, असेही द्विवेदी म्हणाले.

पाकिस्तानचे कारनामे हाणून पाडण्यात यश

सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत उत्तर काश्मीर आणि दोडा-किश्तवाड भागात दहशतवादी कारवाया दिसून आल्या आहेत. पाकिस्तानचे हे कारनामे हाणून पाडण्याचे प्रयत्न भारतीय सुरक्षा दलाकडून केले जात आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. काश्मीरमध्ये आपण हळूहळू दहशतवादाकडून पर्यटनाकडे वाटचाल करत आहोत, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

ईशान्येतील हिंसाचार नियंत्रणात

ईशान्येकडील परिस्थितीही हळूहळू नियंत्रणात येत आहे. आता, सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमधील परिस्थिती देखील नियंत्रणात आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या असल्या तरी तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य सतत काम करत आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि वरिष्ठ अधिकारी भारत-म्यानमार सीमेवरील सर्व समुदायांच्या नेत्यांशी बोलत असल्याचेही सांगितले.

Comments are closed.