जीवन तुरुंगवास, 11.60 लाख रुपये दंड

अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला शिक्षा : लोकप्रतिनिधी न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी/ बेंगळूर

म्हैसूरच्या के. आर. नगरमधील घरकाम करणाऱ्या महिलेवरील अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला जन्मठेप आणि 11 लाख 60 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेतील 7 लाख रुपये पीडितेला भरपाई देण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे. प्रज्ज्वल याच्यावरील आरोपांवर प्रदीर्घ सुनावणी केल्यानंतर शनिवारी लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी हा आदेश दिला. या निकालामुळे देवेगौडा कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप प्रकरणी शुक्रवारी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला दोषी ठरवले होते. प्रज्ज्वल याच्यावर निकाली लागलेले प्रकरण वगळता अन्य तीन प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांत तो कारागृहात असून त्यावरील सुनावणीही सुरू आहे. प्रज्ज्वल हा माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचा पुत्र तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे.

शनिवारी शिक्षा ठोठवण्यापूर्वी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडणारे एसपीपी (विशेष सरकारी वकील) बी. एन. जगदीश यांनी युक्तिवाद केला. अधिकार पदावर असताना प्रज्ज्वलने पीडितेला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. सदर महिला अशिक्षित आहे. धमकावून वारंवार अत्याचार करण्यात आला. तिच्या संमतीशिवाय अत्याचाराचे व्हिडीओ देखील बनविण्यात आले. ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने अपराधी प्रज्ज्वलने व्हिडीओ बनवून त्याचा अस्त्र म्हणून वापर केला. व्हिडीओ उघड झाल्यानंतर तिच्यासह कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. पीडितेला या प्रकरणात केवळ शारीरिकच नव्हे; तर मानसिक छळही सहन करावा लागला होता, असे न्यायालयात सांगितले.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुन्हेगाराच्या कुटुंबाने पीडितेचे अपहरण केले आणि तिच्याकडून आपल्या मनाप्रमाणे जबाब मिळविला. पीडितेला धमकी देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सर्व गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. इतकेच नव्हे तर न्यायालयीन सुनावणी लांबविण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. गुन्हेगाराविरुद्ध अत्याचाराचे आणखी गुन्हे दाखल आहेत. इतर काही महिलांवर अत्याचार केल्याचे व्हिडीओही बनविले. पैसा आणि सत्ता असलेल्या अशा गुन्हेगाराला कमी शिक्षा होऊ नये. गुन्हेगाराची विकृत मानसिकता लक्षा ठेवली पाहिजे. प्रज्ज्वल रेवण्णाला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती एसपीपी बी. एन. जगदीश यांनी न्यायालयाकडे केली.

जेव्हा खासदारच घृणास्पद कृत्य करतो….

राजकारणी म्हणून प्रज्ज्वल हा लहान वयातच खासदार बनला. जनतेने त्याला का निवडून दिले? आणि त्याने काय केले? जेव्हा एखादा खासदारच असे घृणास्पद कृत्य करतो तेव्हा त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगार गरीब नाही, कोट्याधीश आहे. त्यामुळे कलम 357 अंतर्गत मोठ्या रकमेचा दंड ठोठावला पाहिजे. व्हिडीओ उघड झाल्यामुळे पीडित महिला बाहेर कामाला जाऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाचे वकील अशोक नायक यांनी केला.

प्रज्ज्वलचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ नये!

सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला प्रज्ज्वलच्या वकील नलिना मायेगौडा यांनी तीव्र आक्षेप घेतला. युवा खासदार म्हणून प्रज्ज्वल याने जनतेची सेवा केली आहे. पैसे कमावण्याच्या उद्देशाने तो राजकारणात आलेला नाही. आरोपीची राजकीय स्थिती हे शिक्षेचे कारण असू नये. अन्यथा आतापर्यंत त्याने कमावलेल्या चांगल्या नावाचे काय होईल? पीडित व्यक्तीला समाजाने नाकारलेले नाही. ती व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत सामान्य जीवन जगत आहे. निवडणूक काळातच व्हिडीओs व्हायरल करण्यात आला. प्रज्ज्वलविरुद्ध राजकीय कट रचण्यात आला. प्रज्ज्वल तरुण असून त्याचे भविष्यही विचारात घेतले जावे. त्याला वृद्ध आई-वडील आहेत. आजोबा माजी पंतप्रधान आहेत. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे प्रज्ज्वलचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ नये, अशी विनंती केली.

प्रसारमाध्यमांना दोष देणार नाही : प्रज्ज्वल

युक्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीशांनी प्रज्ज्वलना काही प्रतिक्रिया देण्यास इच्छुक आहात का?, असा प्रश्न विचारला. तेव्हा अश्रू अनावर झालेल्या प्रज्ज्वल याने “अनेक महिलांसोबत हे कृत्य केल्याचा आरोप माझ्यावर आहे. मी खासदार झालो तेव्हा कोणीही असा आरोप केला नाही. सहा महिन्यांपासून आई-वडिलांना पाहिलेले नाही. माझी एकमेव चूक म्हणजे मी खूप लवकर राजकारणात वाढलो. या बाबतीत प्रसारमाध्यमांना दोष देणार नाही. न्यायालयाच्या आदेशासमोर नतमस्तक होईन”, अशी प्रतिक्रिया दिली.

कोणत्या कलमाखाली किती शिक्षा

► आयपीसी कलम 376 (2)(क) – जन्मठेप व 5 लाख रु. दंड

► 376 (2)(एन) – वारंवार अत्याचार केल्याबद्दल 5 लाख रु. दंड

► आयपीसी कलम 354 (अ) – 3 वर्षे कारावास व 25,000 रु. दंड

► आयपीसी कलम 354 (ब) – 7 वर्षे कारावास व 50,000 रु. दंड

► आयपीसी कलम 354 (क) – 3 वर्षे कारावास व 25,000 रु. दंड

► कलम 506 अंतर्गत – 2 वर्षे कारावास व 10,000 रु. दंड

► कलम 201 अंतर्गत – 3 वर्षे कारावास व 25,000 रु. दंड

► आयटी कायदा कलम 66 (ई) – 3 वर्षे कारावास व 25,000 रु. दंड

वरील सर्व शिक्षा प्रज्ज्वल रेवण्णा याला एकाचवेळी भोगावी लागणार असून त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होईल, आतापर्यंतच्या कारावासाची शिक्षा त्यातून वजा केली जाणार नाही. कारण त्याला या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही. केवळ बॉडी वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले होते.

प्रज्ज्वलसमोर कोणते पर्याय…

लोकप्रतिनिधी न्यायालयाने दिलेल्या निकालाला प्रज्ज्वल रेवण्णा याला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देता येईल. लोकप्रतिनिधी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती किंवा शिक्षा रद्द करण्याची विनंती तो करू शकतो. त्याचप्रमाणे शिक्षा स्थगित ठेवून जामीन मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे अर्ज करता येईल. उच्च न्यायालयाने या निकालाला अंतरिम स्थगिती दिली तर उर्वरित तीन प्रकरणांमध्ये तो जामिनासाठी पुढील कायदेशीर लढा सुरू ठेवू शकेल. एखाद्या वेळेस उच्च न्यायालयाने देखील लोकप्रतिनिधी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला तर प्रज्ज्वल याच्यासमोर केवळ सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय शिल्लक राहील.

 

Comments are closed.