चंद्रपूरच्या किडनी रॅकेटचे धागे दोरे चीन आणि कंबोडिया पर्यंत, 50 ते 80 लाखाच्या व्यवहारात गरजूला फक्त पाच लाख रुपये

राष्ट्रीय स्तरावरील अवैध किडनी तस्करी रॅकेटचा पूर्व महाराष्ट्रात पर्दाफाश झाला असून या टोळीचे संबंध कंबोडिया आणि चीनपर्यंत असल्याचे उघड झाले आहे. या बेकायदेशीर बाजारात एका किडनी प्रत्यारोपणासाठी 50 लाख ते 80 लाख रुपये आकारले जात होते, तर अत्यंत गरजू दात्यांना फक्त सुमारे 5 लाख रुपये देण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने हा रॅकेट उघडकीस आणला. विदर्भातील मिनथूर गावातील शेतकरी रोशन कुले याने सावकारांच्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी कंबोडियामध्ये स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडल्याची तक्रार केल्यानंतर प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकला.
या प्रकरणात नवी दिल्लीतील डॉ. रविंदर पाल सिंग आणि तिरुची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांची नावे मुख्य सूत्रधार म्हणून समोर आली आहेत. डॉ. सिंग यांना नवी दिल्लीत अटक करण्यात आली होती आणि त्यांना ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते; मात्र महाराष्ट्र पोलिस पथकाचे विमान रद्द झाल्याने न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला. त्यांना २ जानेवारी रोजी चंद्रपूर येथील मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिरुची येथील रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोविंदस्वामी हे मात्र फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांनी सांगितले की अनेक बेकायदेशीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तिरुची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्रत्येक प्रत्यारोपणासाठी 50 ते 80 लाख रुपयांदरम्यान व्यवहार होत होता. डॉ. सिंग हे नवी दिल्लीहून तिरुची येथे जाऊन शस्त्रक्रिया करीत असत आणि त्यांना प्रत्येकी शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 लाख रुपये मिळत होते, तर उपचार आणि रुग्णालयीन व्यवस्था यासाठी डॉ. गोविंदस्वामींकडून जवळपास 20 लाख रुपये आकारले जात असल्याचा आरोप आहे. या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, संबंधित रुग्णालये आणि परदेशी दुव्यांबाबत विशेष तपास पथकाचा तपास सुरू आहे.

Comments are closed.