1 वर्ल्ड कप, 126 गोल, 21 वर्ष अन् असंख्य रेकॉर्ड्स! मेस्सीची शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही भन्नाट कामगिरी, फुटबॉलच्या 'जादुगाराची गोष्ट'
फुटबॉलचा दिग्गज लिओनेल मेस्सीने बुधवारी (7 ऑक्टोबर) अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4:30 वाजता ब्युनोस आयर्समधील एस्तादिओ मॉन्युमेंटल येथे खेळला गेला, जो बेनिनविरुद्ध मैत्रीपूर्ण स्वरूपाचा होता.
मेस्सीने अर्जेंटिनासाठी आपल्या शेवटच्या सामन्यातही जादुई कामगिरी केली. हा सामना अर्जेंटिनाने 3-0 असा जिंकला, ज्यामध्ये मेस्सीने एक गोल आणि दोन असिस्टही केले. यावरून त्याने संघाच्या तिन्ही गोलमध्ये भुमिका बजावली. यानंतर मेस्सीच्या 21 वर्षांच्या उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला.
मेस्सीची कारकिर्द
मेस्सीने अर्जेंटिनासाठी 208 सामने खेळताना 126 गोल केले आणि 70 असिस्ट केले आहेत. तो अर्जेंटिनाच्या इतिहासातील सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे.
दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या प्रवासात मेस्सीने संघाच्या चार मोठ्या विजेतेपद जिंकण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने 2021 आणि 2024 चा कोपा अमेरिका, 2022 चा फिनालिसीमा आणि ज्याची मेस्सीच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती तो फिफा विश्वचषक 2022 जिंकला.
मेस्सीने 2021 च्या कोपा अमेरिका स्पर्धेत 4 गोल आणि 5 असिस्ट केले, तर 2024 च्या आवृत्तीत एक गोल आणि एक असिस्ट केला. तसेच फिफा विश्वचषक 2022 मध्ये त्याने सात गोल आणि तीन असिस्ट केले.
मेस्सीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण
मेस्सीने 2005 मध्ये अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्याआधी त्याने त्याचवर्षी अर्जेंटिनाला अंडर-20 विश्वचषक जिंकून दिला होता. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. तसेच त्याने राष्ट्रीय संघासोबत 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्ण पदकही जिंकले.
असे असले तरी त्याचा राष्ट्रीय संघासोबतचा प्रवास तितका सोपा नव्हता. अर्जेंटिनाला 2014च्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात जर्मनीकडून आणि 2015 व 2016 च्या कोपा अमेरिका स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये चिलीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मेस्सीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे त्याने निराश होत 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्तीही जाहीर केली होती, मात्र थोड्याच कालावधीनंतर तो परतला आणि त्यानंतर फुटबॉलचा इतिहास बदलला असे म्हणणे योग्य ठरेल.
मेस्सीने राष्ट्रीय संघासोबत आपले मोठे यश 2021 मध्ये मिळवले, जेव्हा अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेच्या त्या अंतिम सामन्यात ब्राझीलचा पराभव केला. 2022 मध्ये इटलीविरुद्ध फायनालिसीमा जिंकल्यानंतर अनेक दशके ज्याची प्रतीक्षा अर्जेंटिनाला आणि मेस्सीच्या चाहत्यांना होती, तो फिफा विश्वचषक जिंकला.
कतारमध्ये खेळल्या गेलेल्या 2022 च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. त्या स्पर्धेचा गोल्डन बॉल अवॉर्ड मेस्सीने जिंकला. त्यानंतर 2024 च्या कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात कोलंबियाला पराभूत करून अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा ती स्पर्धा जिंकली. ही सर्व चार मोठी विजेतेपद अर्जेंटिनाने मेस्सीच्या नेतृत्वाखालीच जिंकली.
वयाच्या 39 व्या वर्षीही मेस्सीची जबरदस्त कामगिरी आणि अनेक विक्रमांना गवसणी
मेस्सीने 2026 च्या फिफा विश्वचषकातही आपली धमाकेदार कामगिरी सुरूच ठेवली. वयाच्या 39 व्या वर्षीही त्याने खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्या विश्वचषकात जेव्हा त्याने अर्जेंटिनाच्या पहिल्या सामन्यात खेळला, तेव्हा तो पुरुष फुटबॉलच्या इतिहासात सहा वेगवेगळ्या विश्वचषकात खेळणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच सामन्यात त्याने त्याची विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रीकही नोंदवली आणि विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 16 गोल करणाऱ्या जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोझच्या विक्रमाची बरोबरी केली.
त्या स्पर्धेअंती मेस्सीने आपल्या विश्वचषकाच्या गोलची संख्या 21 वर नेली, मात्र अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला स्पेनविरुद्ध 0-1 असा पराभवाचा सामना करावा लागला. त्या आवृत्तीत मेस्सीने 8 गोल आणि 4 असिस्ट केले.
मेस्सीचे काही खास विश्वचषक विक्रम
2026 च्या विश्वचषकात खेळल्याने मेस्सीच्या विश्वचषकाच्या विक्रमांमध्ये आणखी भर पडली. तो सर्वाधिक फिफा विश्वचषक खेळणारा खेळाडू तर बनलाच, मात्र तो विश्वचषकाचे सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडूही ठरला.
फिफा विश्वचषकाचे विक्रमी 23 विजय मेस्सीच्या नावावर आहे. तसेच तो फिफा विश्वचषकात सर्वाधिक 12 असिस्टसह पहिल्या स्थानी आहे. त्याचबरोबर तीन विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांच्या सुरूवातीच्या अकरा खेळांडूमध्येही असण्याचा अनोखा विक्रम मेस्सीच्याच नावावर आहे.
मेस्सी विश्वचषकात दोनदा गोल्डन बॉल जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने 2014 आणि 2022 मध्ये ही कामगिरी केली.
मेस्सीची उल्लेखनीय कामगिरी काही त्याच्या राष्ट्रीय संघापुरतीच मर्यादित नाही. त्याने बार्सिलोना क्लबसोबत 17 हंगाम खेळताना 778 सामन्यांमध्ये 672 गोल केले. या काळात बार्सिलोनाने 35 विजेतेपद जिंकली. त्यामध्ये 4 चॅम्पियन्स लीग, 10 ला लीगा, 7 कोपा डेल रे आणि 3 क्लब विश्वचषक यांचा समावेश.
मेस्सीने 2012 मध्ये 91 गोल केले होते आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक गोल करण्याचा आपल्या नावावर केला. तसेच त्याने एका हंगामात 50 गोल करून ला लीगामध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
मेस्सीने बार्सिलोनानंतर पॅरिस सेंट-जर्मेनसोबत दोन लीग 1 चे विजेतेपद जिंकले. 2023 मध्ये तो मियामीमध्ये गेला आणि 2026 मध्ये त्याने इंटर मियामीसाठी 100 गोल पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो क्लबच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला.
मेस्सीने विक्रमी आठ बॅलोन डी’ ओर जिंकले. त्याने 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019, 2021 आणि 2023 मध्ये हे पुरस्कार जिंकले.
त्याने 6 वेळा युरोपियन गोल्डन शू पुरस्कारही जिंकला आहे आणि 8 वेळा तो ला लीगाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. बार्सिलोनासाठी क्लबच्या इतिहासात तो सर्वाधिक सामने, सर्वाधिक गोल आणि सर्वाधिक विजेतेपदे जिंकणारा खेळाडू आहे.
Comments are closed.