सुपरस्टार मेस्सीची पावले लवकरच हिंदुस्थानी भूमीवर, तीन दिवसीय हिंदुस्थान दौऱ्यासाठी हिरवा कंदील

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हिंदुस्थान दौऱ्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. 12 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीनदिवसीय दौऱ्याची सुरुवात कोलकात्यातून होणार असून त्यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि दिल्ली येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहील. दौऱ्याची सांगता 15 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने होणार आहे.

हा दौरा ‘गोट टूर ऑफ इंडिया 2025’ या नावाने होणार असून, 2011 नंतर मेस्सीची ही पहिली हिंदुस्थान यात्रा असेल. यावेळी तो कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्धचा फिफा मैत्री सामना खेळण्यासाठी आला होता. या दौऱ्याचे प्रमोटर सताद्रू दत्ता यांनी सांगितले की, मेस्सीच्या आगमनाची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी सोशल मीडियावर घोषणा केली. 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान अधिकृत पोस्टर आणि दौऱ्याची माहिती प्रसिद्ध होईल. मेस्सीसोबत इंटर मियामीचे सहकारी रॉड्रिगो द पॉल, लुईस सुआरेझ, जोर्डी अल्बा आणि सर्जिओ बुस्केट्सदेखील येऊ शकतात. प्रत्येक शहरात मेस्सी मुलांसाठी फुटबॉल मास्टरक्लास घेईल.

कोलकात्यात भरगच्च कार्यक्रम

मेस्सी 12 डिसेंबरला कोलकात्यात पोहोचेल आणि दोन दिवस तिथे मुक्काम करेल. 13 डिसेंबरला तो ‘मीट अॅण्ड ग्रीट’ कार्यक्रमात सहभागी होईल. त्याच्यासाठी विशेष खाद्य व चहा महोत्सव आयोजित केला जाईल ज्यात बंगाली हिलसा मासा, मिठाई आणि आसामी चहा दिला जाईल. त्यानंतर ईडन गार्डन्स किंवा सॉल्ट लेक स्टेडियमवर गोट कॉन्सर्ट आणि गोट कप होईल. शहरात दुर्गापूजेदरम्यान त्याचे 25 फूट उंच आणि 20 फूट रुंद भित्तिचित्र उभारले जाईल, ज्यावर चाहते संदेश लिहू शकतील. हे भित्तिचित्र मेस्सीला भेट म्हणून देण्यात येणार आहे.

मेस्सी सात-सात खेळाडूंच्या सॉफ्ट टच आणि सॉफ्ट बॉल सामन्यातही उतरणार आहे. यात सौरभ गांगुली, लिएंडर पेस, जॉन अब्राहम आणि बायचुंग भुतियाही सहभागी होतील. यादरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मेस्सीचा सन्मान करण्याचीही शक्यता आहे.

दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप

मेस्सी 15 डिसेंबरला दिल्लीला येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तो फिरोजशाह कोटला स्टेडियमवर दुपारी 2.15 वाजता गोट कप आणि कॉन्सर्टमध्ये सहभागी होईल. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे विराट कोहली आणि शुभमन गिल यांनाही आमंत्रण दिले जाईल. कारण ते दोघेही मेस्सीचे मोठे चाहते आहेत.

अहमदाबाद मुंबईतही मेस्सी धावणार

मेस्सी 13 डिसेंबरच्या संध्याकाळी अहमदाबाद येथे अदानी फाऊंडेशनच्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहील. 14 डिसेंबरला तो मुंबईत येईल. दुपारी 3.45 वाजता सीसीआय येथे ‘मीट अॅण्ड ग्रीट’ होईल, तर संध्याकाळी 5.30 पासून वानखेडे स्टेडियमवर गोट कप आणि कॉन्सर्ट रंगणार आहे. मुंबईत ब्रेबर्न येथे मुंबई पॅडल गोट कपदेखील रंगेल. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि लिएंडर पेस काही वेळ मेस्सीसोबत खेळू शकतात. तसेच सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासह गोट कॅप्टन्स मोमेंट हा कार्यक्रमही आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. यात रणवीर सिंग, आमीर खान आणि टायगर श्रॉफ हे सिनेस्टारही सहभागी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Comments are closed.