महाराष्ट्रात भाव वाढले; तळीरामांच्या ग्लासात दमणची दारू; शहापूरजवळ २४ लाखांचा मद्यसाठा जप्त

आता महाराष्ट्रातील तळीरामांच्या ग्लासात गुजरातजवळील दीव-दमणची दारू ओतली जाऊ लागली आहे. दीव-दमणमधून कर चुकवून मोठा दारूसाठा घेऊन येणाऱ्या तस्करांवर शहापूरच्या विहिगाव-खोडाळा येथे राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या टीमने छापा मारला. यावेळी दोनशे ब्लॉ क्स विदेशी मद्याचा साठा आणि पिकअप टेम्पो मिळून २३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्रात दारू किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याचा फायदा दारू तस्कर घेऊ लागले आहेत. त्यामुळे दीव-दमण, दादरा-नगरहवेली येथून विदेशी मद्याचा साठा कर चुकवून महाराष्ट्रात आणला जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण येथील भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील खोडाळा-विहिगाव येथे सापळा रचण्यात आला. यावेळी एक महेंद्र बेलोरो पिकअप टेम्पो सुसाट जाताना दिसला. भरारी पथकाला संशय आल्याने त्यांनी तो थांबवला असता त्या टेम्पोतून दीव-दमण येथून दारूसाठा आणल्याचे उघड झाले. गडबडीचा फायदा घेत चालक मात्र फरार झाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब तपास करीत आहेत.
Comments are closed.