राजावाडीच्या महिला सुरक्षा रक्षकांवर गर्दुल्ल्यांनी केला हल्ला

घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट आहे. या गर्दुल्ल्यांकडून अनेकदा डॉक्टरांना आणि कर्मचाऱयांना धमकावण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तरी परिस्थिती जैसे थे आहे. गुरुवार दुपारच्या सुमारास अपघात विभागाच्या समोर तैनात असलेल्या दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, या घटनेचा शिवसेनेच्या शिव आरोग्य सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करून शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, सचिन भांगे यांनी केली.
Comments are closed.