UTS अ‍ॅप वरून लोकलचा पास काढता येणार नाही, RailOne अ‍ॅप वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारतीय रेल्वेने UTS (Unreserved Ticketing System) अ‍ॅपमधून स्थानिक रेल्वेच्या मासिक पास बुकिंगची सुविधा बंद केली आहे. आता मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पास काढण्यासाठी नवीन RailOne अ‍ॅप वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांच्या मोबाईलवरील जुने पास अद्याप वैध आहेत, ते प्रवासी तेच पास UTS अ‍ॅपवर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना दाखवू शकतात. मात्र UTS अ‍ॅपवर नवीन पास बुक करण्याचा पर्याय पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. UTS अ‍ॅपवर आता युजर्संना पास बुकिंगसाठी RailOne अ‍ॅप वापरण्याचा संदेश दाखवला जात आहे. पास सुविधा हटवण्यात आली असली तरी UTS अ‍ॅपवरून अनारक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा पूर्ववत सुरू राहील.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने RailOne अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट खरेदीवर तीन टक्के सवलत जाहीर केली आहे. कोणत्याही डिजिटल पेमेंट मोडद्वारे व्यवहार केल्यास ही सूट मिळणार असून हा लाभ 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत लागू राहील. यापूर्वी RailOne अ‍ॅपवरील R-Wallet वापरून पेमेंट केल्यास तीन टक्के कॅशबॅक दिला जात होता. नव्या निर्णयानुसार आता UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर डिजिटल पद्धतींनी पेमेंट केल्यास थेट सवलत लागू होईल. या संदर्भातील निर्णय रेल्वे मंत्रालयाने 30 डिसेंबर रोजी CRIS (Centre for Railway Information Systems) यांना कळवला असून आवश्यक सॉफ्टवेअर बदल तात्काळ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RailOne अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर मासिक पास बुकिंग, आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग, परतावा, खाद्य ऑर्डर, गाडी शोध, PNR स्थिती अशी विविध सेवा उपलब्ध आहेत. UTS अ‍ॅप उघडणाऱ्या प्रवाशांना RailOne अ‍ॅप डाउनलोड करण्याचा संदेश दिसत असून, दिलेल्या लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड करून आवश्यक माहिती आणि ओळख तपशील भरत लॉग-इन केल्यानंतर पास बुक करता येईल. याशिवाय इच्छुक प्रवासी रेल्वे स्थानकांवरील काउंटरवरूनही मासिक पास काढू शकतात.

Comments are closed.