'लॉकडाऊन' ही केवळ अफवा आहे.
पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मध्यपूर्वेत युद्ध होत असल्याने भारतात ‘लॉकडाऊन’ होणार, ही निव्वळ अफवा असून तिच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकांना केले आहे. त्यांनी शनिवारी या संदर्भातील स्थिती अधिकृतरित्या स्पष्ट केली. देशात कच्चे इंधन तेल आणि इंधन वायू यांचा साठा समाधानकारक आहे. त्यामुळे या दोन वस्तूंचा उपयोग कमी व्हावा, यासाठी लॉकडाऊन करण्याची कोणतीही परिस्थिती मुळातच नाही. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ लावला जाणार नाही. कोणीही त्याची चिंता करु नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शनिवारी संपर्क साधत पेट्रोलियम मंत्र्यांनी देशाच्या स्थितीविषयी चर्चा केली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘लॉकडाऊन’चा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे स्पष्ट केले. काही समाजविरोधी व्यक्तींनी सोशल मीडियाचा दुरुपयोग घातक अफवा पसरविण्यासाठी चालविला आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला होता. कारण, त्यावेळी तशी गंभीर परिस्थिती होती. पण सध्या इंधनाची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा प्रश्न येत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचेही सुतोवाच त्यांनी केले आहे.
परिस्थिती आव्हानात्मक
भारताकडून इंधनाची आयात केली जात असली, तरी मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आव्हानात्मक आहे. तिच्यात अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. युद्धापूर्वी होती तशी परिस्थिती निर्माण होण्यास आधी युद्ध थांबण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर काही काळाने स्थिती पूर्ववत होणार आहे. असे असले, तरी सध्या कोणीही विनाकारण चिंता करण्याचे कारण नाही. लॉकडाऊन करण्याची स्थिती नाही. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या केंद्र सरकार करत असलेले उपाय पुरेसे आहेत. ‘लॉकडाऊन’सारख्या टोकाच्या निर्णयाचा विचारही करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पुरी यांनी केले आहे.
केंद्र सरकारचे बारकाईने लक्ष
मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर केंद्र सरकारचे बारकाईने लक्ष आहे. भारताचा तेल आणि गॅस पुरवठा खंडित होऊ नये. म्हणून केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनात हे प्रयत्न होत असून ते यशस्वीही झाले आहेत. भारताने आता 41 देशांशी तेलविक्री करार केले आहेत. गॅसही आम्ही अनेक देशांकडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या तेलवाहक आणि वायुवाहक नौका सुखरुपपणे भारतात येत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी वस्तुस्थिती पुरी यांनी कथन केली आहे.
संयमाची आवश्यकता
भारतातील सर्वसामान्य लोकांनीही परिस्थिती लक्षात घेऊन संयम दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यांनी घाबरुन जाऊ नये. तसेच, भीतीपोटी संयम गमावू नये. केंद्र सरकारवर विश्वास ठेवावा आणि शांतपणे आपले व्यवहार करत रहावे. घाईगडबडीने काहीही साध्य होणार नाही. लोकांना स्थितीविषयी माहिती अधिकृतरित्या दिली जात आहेच. तिच्यावरच विसंबून रहावे. अनधिकृत वृत्तांवर विश्वास ठेवून धावपळ करु नये, असे कळकळीचे आवाहन पुरी यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या विधानांचा विपर्यास
‘कोरोना’च्या काळात होती, तशी सावधानता आपल्याला बाळगायला हवी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतल्या त्यांच्या वक्तव्यात केले. तेव्हापासून लॉकडाऊनच्या अफवा पसरविल्या जात आहेत. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांचा विपर्यास केला गेला आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अफवांना झिडकारा, संयम बाळगा
ड अफवांवर विश्वास ठेवून गोंधळ न करण्याचे केंद्राचे सर्वसामान्यांना आवाहन
ड केंद्र सरकारचे स्थितीवर लक्ष, स्थिती नियंत्रणात, भविष्याकाळासंबंधी योजना
ड ‘लॉकडाऊन’सारखी परिस्थिती मुळातच नाही, हे सर्वंनीची जाणणे आवश्यक
ड सध्या भारतात कच्चे इंधन तेल, इंधन वायूचा साठा पुरेसा, स्थिती नियंत्रणात
Comments are closed.