विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा तहकूब
बिहार ‘एसआयआर’वरून गोंधळ : शिबू सोरेन यांच्या निधनामुळे राज्यसभा कामकाज स्थगित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी 11 वा दिवस होता. दोन्ही सभागृहांमध्ये सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाले. लोकसभेत कामकाज सुरू होताच, विरोधकांनी बिहारमधील मतदारसूची पुनर्परीक्षणच्या (एसआयआर) मुद्यावर चर्चा करण्याची मागणी करत गोंधळ सुरू केला. त्यानंतर, सभापतींनी प्रथम दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. तर, राज्यसभेतील कामकाज झामुमोचे खासदार व झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आले. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर, विद्यमान खासदार शिबू सोरेन यांना त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व खासदारांनी मौन पाळल्यानंतर अध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली.
गेल्या 10 दिवसांत फक्त दोन पूर्ण दिवस चर्चा झाली आहे. 21 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले आहे. गेल्या आठवड्यात ‘ऑपरेशन सिंदूर’वर दोन्ही सभागृहांमध्ये वादळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता चालू आठवड्यात बिहारमधील मतदारसूची पुनर्परीक्षणच्या (एसआयआर) मुद्यावर विरोधी पक्षांनी दररोज निदर्शने केली. मागील 10 दिवसात 28 आणि 29 जुलै रोजी पूर्ण दिवस कामकाज झाले. दोन्ही दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या वेळेपेक्षा जास्त गोंधळ दिसून येत आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदावरून अचानक राजीनामा देणे, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यावरून विरोधी पक्ष सरकारवर सतत हल्ला करत आहेत. त्याशिवाय आता बिहारमधील मतदारसूची पुनर्परीक्षणच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. या मुद्यावर विरोधी पक्ष सतत सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत असल्यामुळे गतिरोध निर्माण झाला आहे.
‘गदारोळ असतानाही विधेयके मंजूर होतील’
दरम्यान, बिहारमधील मुद्यावर सभागृहात चर्चा होऊ शकत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे ही निवडणूक आयोगाची कृती असून त्यासंबंधी कोणताही नियम चर्चेला परवानगी देत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सरकार आणि सभापतींनी लोकसभेत गदारोळ असतानाही विधेयके मंजूर केली जातील, असे सभापतींनी आणि सरकारने म्हटले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत विरोधी पक्षनेत्यांसमोर आपली भूमिका मांडली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारपासून सभागृहाचे कामकाज सुरू होईल. सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या विधेयकावर चर्चा केली जाईल. अशा परिस्थितीत आता विरोधकांनी त्यात सहभागी व्हावे की नाही हे ठरवायचे आहे. विरोधकांनी एसआयआरवर गदारोळ सुरू ठेवला तरी गदारोळात विधेयके मंजूर होतील, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
निवडणूक सुधारणांवर चर्चेची काहींकडून मागणी
या सर्वांमध्ये, आता एसआयआरवर चर्चा करण्याऐवजी निवडणूक सुधारणांवर चर्चा करावी. त्या चर्चेत एसआयआर सारखे मुद्देही समाविष्ट करता येतील, अशी सूचना काही विरोधी पक्षांनी केली आहे. संसदेत यापूर्वी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे यावेळीही निवडणूक सुधारणांसारख्या व्यापक मुद्यावर चर्चा करता येईल, असे मत काही पक्षांनी व्यक्त केले आहे.
Comments are closed.