लोकसभा निवडणुकीची माहिती जाहीर

महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक झाल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची विस्तृत माहिती आणि आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. या माहितीतून अनेक स्वारस्यपूर्ण बाबी स्पष्ट झाल्या आहेत. मतदानामध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक उत्साह दाखविला होता. या माहितीत एकंदर मतदार, झालेले मतदान, मतदानाची टक्केवारी, तुलनात्मक आकडेवारी इत्यादी मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

2024 ची लोकसभा निवडणूक एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये झाली. त्यानंतर जून महिन्यात मतगणना करण्यात आली होती. या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला होता. कोणत्याही एका पक्षाला बहुमताची संख्या गाठता आली नव्हती. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी पूर्ण बहुमत दिल्याने हीच आघाडी नंतर सत्तेवर आली. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सूत्रे सोपविण्यात आली. निवडणूक चुरशीची झाली.

साधारणत: 100 कोटी मतदार

या लोकसभा निवडणुकीत एकंदर 97 कोटी 97 लाख, 51 हजार 847 नोंदणीकृत मतदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 91 कोटी 19 लाख 50 हजार 734 इतकी होती. याचा अर्थ असा की 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये मतदारांच्या संख्येत 7.43 टक्के भर पडली, असे स्पष्ट केले गेले.

मतदान किती…

2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकंदर 64 कोटी 64 लाखाच्या वर मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला होता. तर 2019 मध्ये मतदान केलेल्या मतदारांची संख्या 61 कोटी 40 लाखाच्या वर होते. याचाच अर्थ असा की 2024 मध्ये मतदारांची संख्या 3 कोटी 14 लाखांनी अधिक होती.

सर्वाधिक मतदान

आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक, अर्थात 92.3 टक्के मतदान झाले. तर जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघात सर्वात कमी 38.7 टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत नोटा या पर्यायाला 63 लाख 71 हजार 848 मते पडली. ही टक्केवारी एकंदर मतदानाच्या 0.99 टक्के आहे. 2019 मध्ये नोटा या पर्यायाला 1.06 टक्के मते मिळाली होती.

किती मतदान केंद्रे

या लोकसभा निवडणुकीत देशभरात 10 लाख 52 हजार 552 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 10 लाख 37 हजार 848 मतदान केंद्रे होती. या निवडणुकीत केवळ 40 मतदान केंद्रावर पुनर्मतदान करण्याची वेळ आली होती. मात्र, 2019 मध्ये पुनर्मतदान करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची संख्या 540 इतकी होती, असे स्पष्ट करण्यात आले.

उमेदवारही अधिक

2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकंदर 12 हजार 459 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. 2019 मध्ये ही संख्या 11 हजार 692 इतकी होती. 2014 च्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार मलकाजगिरी मतदारसंघात होते. ती संख्या 114 होती. तर सर्वात कमी म्हणजे 3 उमेदवार आसाममधील दिब्रूगढ मतदारसंघात होते. छाननी झाल्यानंतर एकंदर उमेदवारांची संख्या 8 हजार 360 इतकी होती. तर 2019 मध्ये उमेदवारांची संख्या 8,054 इतकी होती.

मतदान कसे झाले…

2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकंदर 65.78 टक्के महिला आणि पुरुष मतदारांनी 65.55 टक्के मतदारांनी मतदान केले. टक्केवारीच्या दृष्टीने महिलांनी पुरुषांना मागे टाकले. तथापि, पुरुषांची एकंदर मतदारसंख्या महिलांपेक्षा अधिक असल्याने एकंदर मतांच्या संख्येत त्या पुरुषांना मागे टाकू शकलेल्या दिसत नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही असेच चित्र पहावयास मिळाले होते.

अन्य देशांच्या तुलनेत आवाढव्य

भारतात 2024 मध्ये झालेली लोकसभा निवडणूक अन्य लोकशाही देशांच्या तुलनेत आवाढव्य अशीच होती, हे आयोगाने घोषित केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, ब्राझील इत्यादी लोकशाही देशांच्या तुलनेत भारतात मतदारांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे आयोगाकडून तितक्याच मोठ्या यंत्रणेचा उपयोग करण्यात आला आहे. या सर्व देशांमध्ये मिळून जितके मतदार आहेत, त्यापेक्षा एकट्या भारतात मतदारांची संख्या अधिक होती. मतदानाच्या टक्केवारीतही भारत आघाडीवर राहिला आहे.

घोषित करण्याचे कारण

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर अशी माहिती घोषित केली जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ही प्रथा पाळण्यात आली आहे. यावेळची माहिती अधिक सविस्तर आणि नेमकी आहे. लोकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये. संपूर्ण माहिती त्यांना एका स्थानी उपलब्ध व्हावी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेत वाढ व्हावी. तसेच ही निवडणूक पारदर्शीपणे पार पडली आहे, हा विश्वास मतदाराच्या मनात निर्माण व्हावा. अशा अनेक कारणास्तव ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

काही महत्वाच्या संख्या…

ड मतदारांची एकंदर संख्या 97 कोटी 97 लाख, 51 हजार 847

ड मतदान केलेल्यांची संख्या 64 कोटी 64 लाख 20 हजार 869

ड मतदानयंत्रांच्या मतांची संख्या 64 कोटी 21 लाख 39 हजार 275

ड पोस्टाने आलेल्या मतांची संख्या 42 लाख 81 हजार 594

ड मतदान केलेल्या महिला 31 कोटी 27 लाख 64 हजार 269

ड मतदान केलेले पुरुष 32 कोटी 93 लाख 61 हजार 948

ड सहा राष्ट्रीय पक्षांनी मिळविलेली मते 63.35 टक्के

ड अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या 7,190

ड निर्विरोध विजयी झालेल्या उमेदवारांचे मतदारसंघ 1 (सुरत)

ड निवडणुकीत असलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या 3,921

ड निवडणूक जिंकलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या केवळ 7

ड निवडणुकीत असलेल्या महिला उमेदवारांची संख्या 800

Comments are closed.