फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविक
पुणे : लोणावळ्यात फळ विक्रेती भाग्यश्री जगतापांवर मतदारांनी मोठा विश्वास दाखवलाय. त्यांचं नगरसेवक होण्याचं ‘भाग्य’ मतदारांनी उजळून टाकलंय. पण नगरसेवक झाल्यानंतर भाग्यश्री हुरळून गेल्या नाहीत. निकालाला 24 तास उलटायच्या आतचं भाग्यश्री यांनी पुन्हा फळ विक्रीला प्राधान्य दिलंय. 10 वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरुचं ठेवणार आणि मतदारांचा विश्वासही सार्थ ठरवणार. असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांना ही आपण नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा चाखतोय, हे पाहून सुखद धक्का बसला. राजकारणाच्या बाजारातील हे सकारात्मक चित्र पाहिलं की आपली लोकशाही अजून ही किती भक्कम आहे, हे यातून अधोरेखित झालं.
राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा काल ( 21 डिसेबर 2025) निकाल लागला. यात 117 ठिकाणी नगराध्यक्ष तर 1100 नगरसेवक विजयी झाले. सर्वाधिक 129 जागा भाजपला मिळाल्या. यात शिंदेंच्या शिवसेनेला 51 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 33 जागा काढता आल्या.
फळविक्रेती ते नगरसेविका…24 तासांच्या आत फळ विक्रीला प्राधान्य
नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी नेत्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आले. राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे यांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या. पण राजकारणाच्या बदलत्या पटावर लोणावळ्यातील फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलं आहे. राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं गेलं आणि विशेष म्हणजे मतदारांनीही फळविक्रेत्या भाग्यश्री जगतापांवर विश्वास टाकला आणि नगरसेविका म्हणून त्यांना निवडून आणलं. सत्ता मिळाली की माणसं बदलतात हे राजकारणात नवीन नाही. पण या मताला खोडून काढत नगरसेवक पद मिळाल्यानंतरही भाग्यश्री जगताप यांनी फळविक्रेतीला प्राधान्य दिल्याचं दिसलं.
नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा
गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांनी व्यवसाय सांभाळत प्रचार केला. दिवसा फळ विक्री करता-करता प्रचार करत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचत त्यांनी प्रचार केला अन निवडूनही आल्या. मिळालेल्या संधीचं सोनं करत आपली मुळं न विसरता त्यांनी आपल्या फळ विक्रीच्या व्यवसायाला प्राधान्य दिल्याचं दिसलं. “10 वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरुचं ठेवणार आणि मतदारांचा विश्वासही सार्थ ठरवणार.” असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांना ही आपण नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा चाखतोय, हे पाहून सुखद धक्का बसला होता.
” माझ्या मतदारांनाही अपेक्षा आहे की मी पहिली पायरी नगर परिषदेची चढावी पण माझा उदरनिर्वाह फळविक्रीत असल्याने मी पहिली पायरी माझीच चढेन. गेल्या दहा वर्षांपासून मी फळ विक्री करते. मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिला आहे त्यामुळे व्यवसाय आणि राजकारण या दोघांची सांगड घालत पुढे जाणार ” असं नगरसेविका भाग्यश्री जगताप म्हणाल्या .
लोणावळा नगरपरिषद – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : राजेंद्र सोनवणे – अजित पवार राष्ट्रवादी
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी – १६
भाजप -04
अपक्ष – 03
फुगवटा – 01
काँग्रेस – 03
एकूण नगरसेवक -27+1 नगराध्यक्ष
आणखी वाचा
Comments are closed.