लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास महाग झाला आहे.

26 डिसेंबरपासून नवे दर लागू : प्रतिकिलोमीटर 1-2 पैसे वाढ : रेल्वेला 600 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन भाडे 26 डिसेंबर 2025 पासून लागू होईल. या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सरकारने रेल्वे तिकिटांच्या किमतीत वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे. या दरवाढीनुसार, 215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रतिकिलोमीटर अतिरिक्त 1 ते 2 पैसे मोजावे लागतील. या बदलामुळे दरवर्षी अंदाजे 600 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल, असा रेल्वे मंत्रालयाचा अंदाज आहे.

रेल्वे मंत्रालयाने वाढत्या ऑपरेशनल खर्च आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज लक्षात घेऊन भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे नवीन गाड्या सुरू करण्यासाठी, स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी सतत गुंतवणूक करत आहे. त्याच अनुषंगाने ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. या भाडेवाढीमुळे मिळणारा 600 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल रेल्वेच्या विकासकामांसाठी वापरला जाईल. रेल्वे विभाग ही देशातील दुसरी सर्वात मोठी नियोक्ता असून तिचे नेटवर्क राखण्यासाठी मोठा खर्च येतो.

लहान मार्गांवरील प्रवाशांना दिलासा

सध्या 215 किलोमीटरपेक्षा कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा की लहान मार्गांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच तिकीटदर आकारले जाणार असल्यामुळे दैनंदिन किंवा कमी अंतराच्या प्रवाशांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. याचा अर्थ असा की कमी अंतराचे प्रवास पूर्वीसारखेच परवडणारे राहील.

लोकल ट्रेन आणि सीझन तिकीट दर जैसे थे

रेल्वेने दैनंदिन प्रवाशांनाही दिलासा दिला आहे. उपनगरीय गाड्या आणि मासिक सीझन तिकिटांच्या (एमएसटी) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याचा थेट फायदा मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होईल.

एका वर्षात दुसऱ्यांदा भाडेवाढ

यापूर्वी, यावर्षी 1 जुलै रोजी सरकारने नॉन-एसी मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी 1 पैसे प्रतिकिलोमीटर आणि एसी क्लास गाड्यांसाठी 2 पैसे प्रतिकिलोमीटर प्रमाणे रेल्वेभाड्यात वाढ केली होती. त्यापूर्वी 2020 मध्ये भाडेवाढ झाली होती.

रेल्वे प्रवासासाठी सामान्य तिकिटाचे प्रिंटआउट सोबत असणे आवश्यक नाही. भारतीय रेल्वेने सामान्य (अनारक्षित) तिकिटांच्या मुद्याभोवतीचा गोंधळ दूर केला आहे. यूटीएस (अनारक्षित तिकीट प्रणाली) मोबाईल अॅपद्वारे बुक केलेल्या तिकिटांचे प्रिंटआउट घेणे आवश्यक नसल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

रेल्वे तिकीट दरातील बदलांची सविस्तर माहिती

रेल्वे वर्ग                                                               तिकीट दर आकारणी

उपनगरीय गाड्या, मासिक सीझन तिकिटे                 कोणताही बदल नाही

215 किमीपर्यंत, सामान्य वर्गाचे भाडे                         कोणताही बदल नाही

215 किमीपेक्षा जास्त, सामान्य वर्गाचे भाडे                प्रतिकिमी 1 पैशाने वाढ

मेल/एक्स्प्रेस नॉन-एसी क्लासचे भाडे                      प्रतिकिमी 2 पैशाने वाढ

मेल/एक्स्प्रेस एसी क्लासचे भाडे                          प्रतिकिमी 2 पैशाने वाढ

500 किलोमीटरपर्यंत, नॉन-एसी क्लास                 अतिरिक्त 10 रुपये

Comments are closed.