दरांचा दीर्घकालीन परिणाम संभव नाही

भारत लवकर पर्यायी निर्यात बाजारपेठा शोधणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिकेने जरी भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लागू केले असले, तरी त्यामुळे भारतावर दीर्घकाळ परिणाम होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन भारताच्या वाणिज्य विभागाने केले आहे. आम्ही भारताच्या वस्तूंसाठी वेगाने नव्या बाजारपेठा शोधत आहोत. त्यात यश मिळण्याची निश्चित शक्यता आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्राने चिंता करु नये, असे आश्वासनही वाणिज्य विभागाकडून देण्यात आले आहे. अमेरिकेच्या 50 टक्के करांचा निश्चितपणे लघुकालीन परिणाम होणार आहे, ही बाब स्पष्ट आहे. विशेषत: वस्त्रोद्योग, रसायने आणि यंत्रसामग्री या क्षेत्रांवर तत्काळ परिणाम संभवतो. ही बाब या क्षेत्रांनाही ज्ञात आहे.

मात्र, यामुळे जी हानी होईल ती दीर्घकाळासाठी असणार नाही. भारताने आता युद्धपातळीवर निर्यात प्रोत्साहन अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे नव्या बाजारपेठा भारताच्या वस्तूंसाठी उपलब्ध होणार आहेत. या शोधाच्या प्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे. परिस्थिती कठीण नाही, हे सर्व संबंधितांनी समजून घ्यावे. केंद्र सरकार सर्व निर्यातप्रधान उद्योगांना आधार देण्यास सक्षम आहे. ती योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. निर्यात साखळ्या नव्याने निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या साखळ्या भक्कम आणि विश्वासार्ह असतील, हे सुनिश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

संकट ही संधी

प्रत्येक नवी परिस्थिती हे एक आव्हान असते आणि त्यात एक संधीही असते. भारत या आव्हानाचा उपयोग आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी करुन घेणार असून तशा योजना सज्ज करण्यात येत आहेत. हे अव्हान अकस्मात उभे ठाकल्याने प्रारंभीच्या काळात काही उद्योगांना त्रास होईल. काही प्रमाणात उलाढाल कमी होईल. मात्र, लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल. तेव्हा उद्योगांनी या संदर्भात घाबरुन न जाता काहीकाळ धीर धरावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

चर्चेचा मार्ग राहणारच

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याची शक्यता दुरावलेली नाही. यासंबंधीच्या चर्चेचा प्रारंभ लवकरच होईल, अशी भारताला आशा वाटते. भारताने आपले प्रयत्न थांबविलेले नाहीत. अमेरिकेकडूनही प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जेव्हा, या चर्चेचा पुन्हा प्रारंभ होईल, त्यावेळी 25 टक्के व्यापार शुल्क आणि त्यानंतरची 25 टक्क्यांची वाढ, या बाबी चर्चेला येतीलच. त्यानंतर हा करार होऊ शकतो, अशी माहिती अन्य एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

काही उद्योगांवर तत्कालिक परिणाम

अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे काही उद्योग क्षेत्रांना काही काळासाठी परिणाम सोसावा लागणार ही बाब उघड आहे. त्यांच्यात वस्त्रोद्योग प्रामुख्याने आहे. केंद्र सरकार यावर विविध मार्गांनी उपाययोजना करीत आहे. त्यामुळे लवकरच समस्या सुटू शकते. प्रभावित लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकार प्राधान्याने काही योजनांवर काम करत असून लवकरच त्यांचे लाभ दिसतील, असे स्पष्ट केले गेले.

अद्यापही चर्चा शक्य

अमेरिकेशी भारताची होत असलेली व्यापार करार चर्चा सध्या थांबलेली आहे. मात्र, ती कायमस्वरुपी बंद झालेली नाही. दोन्ही देश आजही व्यापार करारासाठी उत्सुक आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. तथापि, त्यामुळे संपूर्ण द्विपक्षीय संबंधांवरच परिणाम होईल, अशी शक्यता नाही. गेली 25 वर्षे भारत आणि अमेरिका यांच्यात धोरणात्मक भागीदारी आहे. ती सहजासहजी प्रभावित होणार नाही. अमेरिकेशी चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत. काही काळ जाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, हा आमचा आशावाद जागृत आहे, असे प्रतिपादन वाणिज्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने केले आहे.

Comments are closed.