लाईव्ह शोदरम्यान WCL मालकाचा करिश्मा कोटकला प्रेमाचा प्रस्ताव, काही तासांत केला फोटोही शेअर

वर्ल्ड चॅम्पियनशिप लेजंड्स 2025 (World Championship of Legends) स्पर्धेचा समारोप एबी डिव्हिलियर्सने (Ab devilliers) एक अप्रतिम शतक ठोकून केला. त्याने अवघ्या 60 चेंडूंमध्ये 120 धावा फटकावत दक्षिण आफ्रिका संघाला पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध अंतिम सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. रविवारी एजबेस्टन येथे पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले 196 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने केवळ 16.5 षटकांत पूर्ण केले.

या खेळीत डिव्हिलियर्सने 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्याने हाशिम आमलासोबत 72 धावांची आणि जीन-पॉल ड्युमिनीसोबत नाबाद 125 धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून शारजिल खानने 44 चेंडूंमध्ये 76 धावा करत संघाला 195/5 अशी धावसंख्या गाठून दिली होती, मात्र डिव्हिलियर्सच्या आक्रमक खेळीमुळे अंतिम सामना एकतर्फी ठरला.

तत्पूर्वी, सामना संपल्यानंतरचा एक क्षण संपूर्ण संध्याकाळचं सर्वात अनपेक्षित वळण ठरला. WCL चे मालक हर्षित तोमर (Harshit Tomar) यांची अँकर करिश्मा कोटकशी (Karishma Kotak) लाईव्ह मुलाखत सुरू होती. सेगमेंटच्या शेवटी करिश्माने विचारले की, स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्यानंतर तुम्ही कशी सेलिब्रेशन करणार? तेव्हा तोमर यांनी थेट उत्तर दिलं, कदाचित ही स्पर्धा संपल्यानंतर मी तुला प्रपोज करणार आहे.

हे वक्तव्य थेट लाईव्ह शोवर झाल्याने करिश्मा कोटक आश्चर्यचकित झाली. तिने ‘ओ माय गॉड’ अशी प्रतिक्रिया दिली आणि नंतर पटकन स्वतःला सावरत अँकरची भूमिका पुन्हा निभावली. हा प्रसंग इतका अचानक घडला की सोशल मीडियावर याची मोठी चर्चा रंगली. काही प्रेक्षकांनी याला अवघड आणि अस्वस्थ करणारा क्षण म्हटलं, तर काहींनी तोमर यांच्या परखडतेवर टीका केली आणि असं म्हणाले की, लाईव्ह शोदरम्यान अशी प्रतिक्रिया करिश्माला अडचणीत टाकू शकते.

मात्र हर्षित तोमर यावर काहीसे बेफिकीर दिसले. काही तासांतच त्यांनी करिश्मा कोटकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्याला हृदयाच्या इमोजीसह कॅप्शन दिलं होतं. WCL टीममधील एका सदस्याने ‘टचवूड’ अशी कमेंट करत त्यांच्या नात्याबद्दल काहीतरी खास असल्याचं सूचित केलं.

डिव्हिलियर्स आणि त्याच्या संघाने विजेतेपद जिंकलं, पण सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती हर्षित तोमर आणि करिश्मा कोटक यांच्यात झालेल्या या क्षणाची. दरम्यान, स्पर्धेतील आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध दोन वेळा त्यात उपांत्य सामना देखील होता. पण भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे काही प्रमाणात वाद निर्माण झाला होता.

Comments are closed.