माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती

कोकणातील भात शेती क्षेत्र छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेली आहे. अनियमित पडणारा पाऊस आणि शेतीसाठी वाढत्या खर्चामुळे शेतीक्षेत्र कमी होत आहे. कमी होणारे मनष्यबळ यामुळेही शेती परवडेनाशी झाली आहे. असे असताना पारंपारिक शेती जतन व्हावी आणि घरातील सर्व कुटूंबियांमध्ये एकोपा राहावा यासाठी माभळे जाधववाडीतील २० कुटूंबे एकत्र येवून सलग पाचवी पिढी सामूहिक शेतीचा पॅटर्न राबवत आहे.

अनियमित पावसाचा कोकणातील भात शेतीला मोठा फटका बसतो. कोकणातील शेती क्षेत्र विभागले गेले आहे. कुटूंब विभक्त झाल्याने जमिनीचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी झाल्याने अनेकांनी शेती सोडली आहे. त्यामुळे भात शेतीचे क्षेत्र कमी होवू लागले आहे.

मात्र माभळे जाधववाडीतील २० कुटूंबियांनी आपली पारंपारिक शेती जतन केली आहे. दरवर्षी शेती करण्यासाठी 20 कुटूंबातील ७० माणसे एकत्र येवून मेहनत घेतात. कवल तोडणीपासून शेतीच्या सर्व कामांमध्ये घरातील लहान मोठ्यांचा हातभार लागतो. जाधव कुटूंबियांची बोकडचा मळा येथे दोन एकर जमीन असून त्यामध्ये भात शेती करत आहेत. एकत्र कुटूंबियांची जवळपास २० एकर शेतीक्षेत्र आहे. शेतीतील हिश्यातून आजारी व्यक्तीवर उपचार सामुहिक शेती करत असताना ज्येष्ठ मंडळींना सर्वात मोठा मान दिला जातो. 20 कुटूंबातील कोणी आजारी पडले तर, या शेतीतून मिळणाऱ्या उत्पनाचा हिस्सा देवून त्यांच्या खर्चाची तरतूद केली जाते. शिमगा झाल्यावर पालखी घरोघरी जाण्याच्या अगोदर या शेतीचा पहिला मान आहे. या ठिकाणी जावून नंतर पालखी घरोघरी जाते. आजही ही परंपरा सुरू आहे. त्याठिकाणी जाधव कुटूंबियांनी सहान तयार केलेली आहे.

याबाबत बोलताना जाधव कुटूंबियांतील जेष्ठ सदस्य वामन जाधव म्हणतात की, आजही सामूहिक शेतीची परंपरा सुरू असल्याचा आनंद होत असल्याचे सांगतात. शेती निमित्त आम्ही सर्व एकत्र येतो आणि शेती करतो . भात शेती दरम्यान जेवण, एकत्र विचार आणि मेहनत यांची देवाण घेवाण होते.

Comments are closed.