नेपाळनंतर या देशात Gen-Z रस्त्यावर, उग्र निदर्शने; सत्तापालटाच्या भीतीने राष्ट्रपती देश सोडून पळाले

नेपाळनंतर आता आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या मादागास्कर या बेटावर Gen-Z आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे. एका विशेष लष्करी तुकडीने सरकारविरुद्ध भूमिका घेतली आहे. या बंडामुळे तरुणाईदेखील रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे या देशात हे बंड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सत्तापालटाच्या भीतीने मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर हे बंड झाले आहे.
मादागास्करमध्ये सुमारे ३० दशलक्ष लोकसंख्येपैकी तीन चतुर्थांश लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. जागतिक बँकेच्या मते, १९६० पासून २०२० पर्यंत देशाच्या दरडोई जीडीपीमध्ये ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. पाणी आणि वीज टंचाईवरून २५ सप्टेंबर रोजी निदर्शने सुरू झाली आणि जनरल झेड तरुणांनी या आंदोलनाला “जनरल झेड मेडागास्कर” असे नाव दिले आहे. हळूहळू, ही चळवळ भ्रष्टाचार आणि असमानतेविरुद्धच्या देशव्यापी निषेधात रूपांतरित झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, आतापर्यंत किमान २२ लोक मारले गेले आहेत, जरी सरकारने हा आकडा नाकारला आहे.
या विरोधात तीन आठवड्यांपासून तरुण रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध निदर्शने करत आहेत. दरम्यान, या गोंधळाच्या वातावरणातच विरोधकांनी दावा आहे की राष्ट्रपती देश सोडून पळून गेले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाने सोमवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून भाषण जाहीर केले होते, परंतु सैनिकांनी राज्य प्रसारकावर हल्ला केल्यानंतर ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते सिटियन रँड्रियानासोलोनियाको म्हणाले की, माहितीनुसार, राजोएलिना रविवारी फ्रेंच लष्करी विमानाने देश सोडून पळून गेले. तथापि, राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
२००९ मध्ये राजोएलिनाला सत्तेत आणण्यास मदत करणाऱ्या कॅपसॅट नावाच्या विशेष लष्करी युनिटने सर्व सशस्त्र दलांचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. कॅपसॅट कमांडर कर्नल मायकेल रँड्रियानिरिना म्हणाले की, या संघर्षात एक सैनिक मारला गेला, परंतु त्यांनी बंड केल्याचे नाकारले. ते म्हणाले, सैन्य जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत होते. या सर्व घडामोडींमुळे आता हे बंड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Comments are closed.