अभिनेता विजयच्या सुरक्षारक्षकाने चाहत्याच्या डोक्यावर धरली बंदूक; विमानतळावरचा व्हिडीओ झाला व्हायरल
मदुराई विमानतळावरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता राजकारणी विजय याच्या एका सुरक्षा रक्षकाने चाहत्यावर बंदूक दाखवल्याचे दिसून आले आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांवरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. 5 मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे विजयच्या अडचणीत वाढ झाली आहे.
व्हिडीओमध्ये, एक चाहता मदुराई विमानतळावर पोहोचल्यानंतर काही क्षणातच विजयच्या दिशेने धावताना दिसत आहे. अनेकांनी दावा केला की विजयच्या सोबत असलेल्या गार्डने थेट चाहत्याच्या डोक्यावर बंदूक दाखवल्याचे दिसून आले.
मात्र विजयच्या सुरक्षा रक्षकांतील सूत्रांनी वेगळेच उत्तर दिले. त्यांच्या मते, गार्ड नुकताच गाडीतून बाहेर पडला होता आणि त्याचे शस्त्र व्यवस्थित सज्ज करताना अचानक चाहता तिथे येऊन धडकल्याने त्याच्या डोक्यावर ती बंदूक पकडल्याचे वाटत आहे. चाहत्याचा उताविळपणा रोखण्यासाठी बंदूक दाखवण्यात आली. मात्र त्याला इजा करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे एका सूत्राने सांगितले.
इंबराज नावाने ओळख सांगणाऱ्या चाहत्यानेही आपली चूक मान्य केली. ‘मी सुरक्षा वर्तुळ भेदून उडी मारायला नको होती हे मी मान्य करतो’, असे तो म्हणाला. ‘पण मला बाहेर खेचले जात असताना, कोणतीही बंदूक दिसली नाही’, असेही त्याने स्पष्ट केलं.
याआधीच विजयने त्याच्या चाहत्यांना आपल्याला भेटण्यासाठी कोणतेही विचित्र पाऊल उचलू नये असे आवाहन केले होते. या सार्वजनिक आवाहनानंतर देखील ही घटना घडली. 1 मे रोजी चेन्नई विमानतळावर माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, चाहते चालत्या वाहनांवर चढताना किंवा त्याच्या नावाने स्टंट करतानाचे दृश्य खूपच अस्वस्थ करणारे होते.
‘माझ्या व्हॅनचा पाठलाग करू नका किंवा हेल्मेटशिवाय उभे राहून दुचाकी चालवू नका. अशा गोष्टींना मी खरोखर घाबरतो’, असे विजयने थेट म्हटले होते. ‘लवकरच, मी पक्षाच्या बॅनरखाली तुम्हा सर्वांना वेगळ्या ठिकाणी भेटेन. कृपया सुरक्षित रहा आणि मला भेटल्यानंतर घरी सुरक्षित परता.
फेब्रुवारी 2025 पासून केंद्रीय गृह मंत्रालयाने विजयला ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. या सुरक्षा कव्हरमध्ये कमांडोसह 11 सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे, ज्यांना चोवीस तास त्याचे संरक्षण करण्याची आणि त्याच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Comments are closed.