Health Tips: मॅगी खाणं मुलांच्या आरोग्यासाठी घातक, वाचा आहारतज्ञांचा सल्ला
सध्या झटपट तयार होणाऱ्या अन्नपदार्थांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये मॅगीसारख्या इंस्टंट नूडल्सचे आकर्षण वाढताना दिसत आहे. वेळेची बचत आणि मुलांची मागणी म्हणून अनेक पालक ही मॅगी सहज डब्ब्यात देतात किंवा संध्याकाळी खाऊ म्हणून देतात. मात्र आहारतज्ज्ञांचे मत वेगळंच आहे मॅगी किंवा तत्सम इंस्टंट पदार्थ केवळ अन्न नसून आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतात. (maggi harmful for kids health dietician warning)
‘ओन्ली मानिनीला दिलेल्या खास मुलाखतीत आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी मुलांच्या आहारात मॅगीसारख्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा धोका स्पष्ट शब्दांत समजावून सांगितला.
त्या म्हणाल्या, “आजकाल अनेक शाळांमध्ये डब्ब्यात पोळी-भाजी अनिवार्य आहे, पण मुले हा डब्बा पूर्ण खात नाहीत. मग पर्यायी म्हणून पालक मॅगी, चिप्स, बिस्किटं देतात. पण एक छोटं मॅगीचं 75 ग्रॅमचं पॅक सुमारे 300 ते 400 कॅलरीज देतं. त्या कॅलरीत तुम्ही एक वाटी भात, वरण, भाजी, दोन पोळ्या खाऊ शकता म्हणजे संपूर्ण, पोषणमूल्य असलेलं जेवण मिळू शकतं.”
डॉ. प्रणिता पुढे म्हणाल्या की, “मॅगीसारख्या इंस्टंट पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात फॅट्स, सॉल्ट आणि साखर असते, जी शरीरात डोपामिन स्रावास चालना देते. यामुळे मुले या चवेला ‘ऍडिक्ट’ होतात आणि पुन्हा पुन्हा अशीच चव हवीशी वाटते. ही प्रक्रिया त्यांच्या आरोग्यास दीर्घकालीन दुष्परिणाम देऊ शकते वजनवाढ, पोषणअभावी कमजोरी आणि मानसिक आरोग्याच्या समस्या याचं प्रमाण वाढू शकतं.”
तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला काय?
मॅगीसारखे इंस्टंट पदार्थ शक्यतो टाळावेत. पालकांनी मुलांना पोषणमूल्य असलेले घरगुती अन्न द्यावं. डब्बा मुलांना आवडेल अशा पद्धतीने विविध चवींचा आणि सहज खाण्यासारखा बनवावा. मुलांना पोळी भाजी न खाण्यासाठी शिक्षा न करता संवाद साधावा आणि त्यांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावाव्यात.
मॅगी हे जेवणाचं पर्याय नाही, ती एक सवय बनत जाते आणि त्याचे परिणाम अनेकदा उशिरा जाणवतात. लहान वयातच आरोग्याच्या सवयी योग्य नसतील तर मोठेपणी त्याची मोठी किंमत द्यावी लागू शकते. त्यामुळेच पालकांनी सजग राहणं आणि आहारविषयक निर्णय सुस्पष्टपणे घेणं ही काळाची गरज आहे.
Comments are closed.