Maghi Ganeshotsav 2025 – कोर्टाच्या कचाट्यातून बाहेर, 177 दिवसांनी होणार चारकोपच्या राजाचं विसर्जन

माघी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या थाटात बसवण्यात आलेला चारकोपचा राजा गेल्या 177 दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतीक्षेत होता. माघी गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी महापालिकेने गणेश मंडळांना नोटिसा पाठवून पीओपीच्या उंच मूर्तींचे विसर्जन समुद्रात करता येणार नाही, असे सांगितले होते. परंतु उंच मूर्ती असल्याने त्यांचे विसर्जन समुद्रातच व्हायला हवे, अशी भूमिका मंडळांनी घेतली. अखेर न्यायालयाकडून गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आल्याने धानुकर वाडी येथील तलावात चारकोपच्या राजाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच POP च्या गणेशमूर्तींचे सुमद्रामध्ये विसर्जन करण्यास महापालिकेने परवानगी नाकारली होती. त्यामुळे माघी गणेशोत्सवानिमित्त बसवण्यात आलेले गणपती बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत होते. उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मागील 6 महिन्यांपासून कांदिवलीतील चारकोपचा राजा मंडपातच विराजमान होता. तसेच पुढील निर्णय येईपर्यंत आम्ही राजाचे व्यवस्थित जतन करू, असे चारकोपचा राजा मंडळाच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावरून जाहीर केले होते. अखेर 177 दिवसांच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर न्यायालयाने मंडळाला चारकोपच्या राजाचे समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि गणेशभक्त सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच विसर्जन करण्यात येणार आहे.
Comments are closed.